Mitchell Starc IPL Price 2025: क्रिकेट विश्वात आपल्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांंनी आयपीएलमुळे भारताचे नाव मोठे झाले असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी ऑस्ट्रेलियात मिचेल स्टार्कला २१ कोटी रुपये कोण देईल?”, असा सवालही उपस्थित केला आहे.
“इंडियन प्रीमियर लीगमुळे जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. पूर्वी, आम्ही इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने काउंटी चॅम्पियनशिप खेळण्यासाठी जात होतो, आता आयपीएलमुळे त्यांचे खेळाडू आपल्या देशात येत आहेत,” असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.
भारतासाठी अभिमानाची गोष्ट
“ऑस्ट्रेलियामध्ये मिशेल स्टार्कला २१ कोटी कोण देणार? हे मार्केटिंग मॅनेजरचे स्वप्न आहे. बरेच लोक टीका करतात, पण भारतीय क्रिकेट इतक्या सुंदरपणे चालल्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.” सिद्धू यांनी एका आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “भारतीय क्रिकेट इतके मोठे आहे की ते एस्किमोंना बर्फ आणि अरबांना वाळू विकू शकते.”
२०२४ च्या आयपीएलमध्ये फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले, ज्यामध्ये अभिषेक शर्मा आणि अंगकृष रघुवंशी सारख्या तरुण खेळाडूंनी यश मिळवले. सिद्धू यांनी ‘बोल्ड विरुद्ध गोल्ड’ वादावर भाष्य केले आणि दावा केला की तरुण पिढी वरिष्ठ खेळाडूंची जागा घेण्यास तयार होत आहे. ते म्हणाले, “दोन पिढ्यांमध्ये कोणताही विरोध नाही. तरुण, धाडसी पिढीला सुवर्ण पिढीने घडवले आहे. भारतासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की तरुण पिढी पुढे जाण्यासाठी सज्ज होत आहे.”
मिचेल स्टार्कला ११.७५ कोटी रुपये
२०२५ च्या आयपीएल लिलावात, दिल्ली कॅपिटल्सने मिचेल स्टार्कला ११.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. कोलकाता नाईट रायडर्ससाठी २०२४ चा हंगाम स्वप्नवत होता, त्याने कोलकाताच्या जेतेपदामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीही केकेआरने आश्चर्यकारकपणे त्याला करारमुक्त केले होते.