दिल्लीची चार गडी राखून सरशी; कुलदीप, मुस्तफिझूर चमकले
अन्वय सावंत
मुंबई : चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (४/१४) आणि मुस्तफिझूर रहमान (३/१८) यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर चार गडी राखून मात केली. कोलकाताचा हा सलग पाचवा पराभव ठरला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने दिलेले १४७ धावांचे लक्ष्य दिल्लीने १९ षटकांत गाठत हंगामातील चौथा विजय मिळवला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर बाद केले. तसेच मिचेल मार्शही (१३) लवकर बाद झाला. मग डेव्हिड वॉर्नर (२६ चेंडूंत ४२) आणि ललित यादव (२९ चेंडूंत २२) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६५ धावांची भागीदारी रचली. मात्र, उमेशने वॉर्नर आणि कर्णधार ऋषभ पंत (२), तर नरिनने ललितला बाद करत दिल्लीला पुन्हा अडचणीत टाकले. परंतु रोव्हमन पॉवेल (१६ चेंडूंत नाबाद ३३) आणि अक्षर पटेल (१७ चेंडूंत २४) यांच्या योगदानामुळे दिल्लीने सामना जिंकला.
तत्पूर्वी, कोलकाताने २० षटकांत ९ बाद १४६ अशी धावसंख्या उभारली. त्यांचे सलामीवीर आरोन फिंच (३) आणि वेंकटेश अय्यर (६) लवकर बाद झाले. तसेच कुलदीपने सलग दोन चेंडूंवर बाबा इंद्रजित (६) आणि सुनील नरिन (०) यांना माघारी धाडल्याने कोलकाताची ४ बाद ३५ अशी स्थिती झाली. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यर (३७ चेंडूंत ४२), नितीश राणा (३४ चेंडूंत ५७) आणि रिंकू सिंह (१६ चेंडूंत २३) यांनी चांगल्या खेळी करत कोलकाताला दीडशे धावांसमीप नेले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ९ बाद १४६ (नितीश राणा ५७, श्रेयस अय्यर ४२; कुलदीप यादव ४/१४, मुस्तफिझूर रहमान ३/१८) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स : १९ षटकांत ६ बाद १५० (डेव्हिड वॉर्नर ४२, रोव्हमन पॉवेल नाबाद ३३; उमेश यादव ३/२४)
१५.२५ कोटींचे दोन खेळाडू संघाबाहेर
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांना संघाबाहेर ठेवले. यंदाच्या ‘आयपीएल’ खेळाडू लिलाव प्रक्रियेपूर्वी कोलकाताने वरुणला आठ कोटी रुपये देत संघात कायम ठेवले होते. तर कमिन्सला ७.२५ कोटी रुपयांची बोली लागली होती. मात्र, या दोन्ही खेळाडूंना यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. वरुणने आठ सामन्यांत केवळ चार, तर कमिन्सने चार सामन्यांत चार गडीच बाद केले आहेत.
कुमारचा समावेश
मुंबई : दुखापतग्रस्त गोलंदाज मोहम्मद अर्शद खानच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेया सिंगचा मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader