IPL 2023, Nehal Wadhera Smashes Biggest Six : आयपीएल २०२३ च्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅंलेजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईने दिलेलं १७१ धावांचं लक्ष्य आरसीबीने १७ षटकांच्या आत पूर्ण केलं. विराट-फाफच्या वादळी अर्धशतकी खेळीमुळं आरसीबीला सामना खिशात घालता आला. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या दोन फलंदाजांचा जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. तिलक वर्माने आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवलाच, पंरतु मुंबईच्या नेथल वधेरानेही सर्वांचा लक्ष वेधून घेतलं.
१४ व्या षटकात नेहलने फिरकीपटू कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार ठोकला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये १०१ मीटरचा हा षटकार पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नेहलने ठोकलेल्या षटकाराचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.
तिलक वर्मा आक्रमक फलंदाजी करत असतानाच वधेरानेही जलवा दाखवण्यास सुरुवात केली होती. परंतु, षटकार ठोकल्यानंतर त्याच षटकात शर्माच्या गोलंदाजीवर वधेरा बाद झाला. वधेराने शर्माच्या फिरकीवर आक्रमक अंदाजात आणखी एक मोठा फटका मारला, पण यावेळी त्या षटकार ठोकण्यात यश मिळालं नाही. कारण विराट कोहलीने वधेराचा झेल पकडला.
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची दाणदाण उडाली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टीम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. पण विराट कोहली आणि फाफच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने विजयाच्या दिशेनं कूच केली आणि मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.