पीटीआय, मुंबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर घेतलेल्या ‘डीआरएस’चे निर्णय अधिक अचूक राहण्यासाठी नव्या ‘हॉक-आय’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे आधीच तंत्रपूर्ण असलेली ‘आयपीएल’ स्पर्धा आता अधिक हाय-टेक होणार आहे. या नव्या प्रणालीचा वापर केल्यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय कमी वेळात देता येणार आहेत. यासाठी ‘हॉक-आय’ प्रणालीचे तंत्रज्ञ तिसऱ्या पंचासोबत बसणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘बीसीसीआय’ने ही प्रणाली समजून घेण्यासाठी काही निवडक पंचांची दोन दिवसीय कार्यशाळा घेतली होती. यातून आगामी आवृत्तीत नव्या प्रणालीवर काम करण्यासाठी १५ पंचांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत तिसऱ्या पंचाला यष्टिचीत, पायचीत, धावबाद अशाबाबत निर्णय घेताना एका वेळी एकच क्षण बघता येत होता. या नव्या प्रणालीमुळे तिसऱ्या पंचाला एका वेळी चारही बाजूने तो क्षण दिसणार असल्यामुळे तो झटकन निर्णय घेऊ शकेल.

हेही वाचा >>>IPL 2024: विराट कोहली आणि संघाने महिला RCB टीमला दिला गार्ड ऑफ ओनर, व्हिडिओ होतोय व्हायरल

‘हॉक-आय’च्या किती कॅमेऱ्यांचा वापर

या प्रणालीचा वापर करण्यासाठी मैदानावर आठ ‘हॉक-आय’ कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. हे आठही कॅमेरे मैदानालगत बसविण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन कॅमेरे खेळपट्टीच्या चारही बाजूने बसवले जातील. यामुळे जमिनीलगत घेतल्या जाणाऱ्या झेलांचा निर्णय अधिक अचूक पद्धतीने घेता येऊ शकेल. यामध्ये एका कॅमेरा थेट क्षण दाखवेल, तर दुसरे कॅमेरे त्यांच्या बाजूने क्षण दाखवतील.

निर्णय अधिक जलद कसे होणार?

मैदानावरील पंचांच्या निर्णयाला दाद मागितली गेल्यावर आतापर्यंत तिसरे पंच थेट प्रसारण करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करत होते. तेव्हा पंच आणि हॉक-आय प्रणाली यांच्यातील दुवा म्हणून ते काम करत होते. मात्र, आता थेट प्रसारण करणाऱ्या तज्ज्ञांना सहभागी करून घेतले जाणार नाही. निर्णय अधिक गतिशील आणि अचूक राहावेत यासाठी हॉक-आय तज्ज्ञच तिसऱ्या पंचाबरोबर बसणार आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New system in ipl for accurate decisions sport news amy