IPL 2025 Nicholas Pooran Singing Hindi Song Video: आयपीएल २०२५ मधील ऑरेंज कॅपवर आपला कब्जा कायम ठेवणारा निकोलस पुरन यंदा तुफान फॉर्मात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना निकोलस पुरनने उत्कृष्ट खेळी करताना दिसत आहे. आज १४ एप्रिलला लखनौचा संघ चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळत आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी लखनौ संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये निकोलस पुरन हिंदी गाणं बोलत आहे.
लखनौचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन वेस्ट इंडिजचा असला तरी भारतात त्याचे चाहते कमी नाहीत. निकोलसच्या फलंदाजीचा चाहतावर्ग भारतातही आहे. एलएसजीने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हीडिओमध्ये निकोलस पुरन गाणं गाताना दिसत आहे.
निकोलस पुरन या व्हीडिओमध्ये ‘रुस्तम’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘तेरे संग यारा’ हे गाणं गाताना दिसत आहे. त्याला हिंदीत गाताना पाहून संघाचा कर्णधार ऋषभ पंतही थक्क झाला. त्याचबरोबर चाहतेही यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. निकोलस पुरन लखनौ संघाच्या इतर खेळाडूंबरोबर हे गाणं गात आहे. यापूर्वी निकोलस पुरनचा अजून एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये तो पंजाबी गाण्यावर जिममध्ये नाचताना दिसत होता. हा व्हीडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.
निकोलस पूरन या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये चार अर्धशतकांसह ३४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २१५.४३ राहिला आहे. पण धोनीच्या सीएसकेविरूद्ध मात्र निकोलस पुरन फेल ठरला. निकोलस पुरन आपल्या नेहमीच्या अंदाजात चेन्नईसमोर मोठी कामगिरी करू शकला नाही. पुरन फक्त ८ धावा करत माघारी परतला. सीएसकेचा युवा गोलंदाज अंशुल कंबोजने त्याला सामन्याच्या चौथ्या षटकात पायचीत केले.