Nitish Kumar Reddy APL 2024 Most Expensive Player : आयपीएल २०२४ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघातील एका युवा अष्टपैलू खेळाडूची लॉटरी लागली आहे. आंध्र प्रीमियर लीग (एपीएल) च्या इतिहासातील सर्वात मोठी बोली २० वर्षीय अनकॅप्ड नितीश रेड्डीसाठी लावली गेली आहे. या देशांतर्गत टी-२० लीगमध्ये नितीशने सर्वांना मागे टाकत इतिहास रचला आहे. या आयपीएल हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले होते.
या युवा अष्टपैलू खेळाडूसाठी आंध्र प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली गेली. मार्लिंगोदावरी टायटन्सने नितीश कुमार रेड्डीला १५.६ लाख रुपयांना खरेदी केले. इतिहास रचल्यानंतर नितीश यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो सनरायझर्स हैदराबाद येथील त्याच्या हॉटेल रूममधून एपीएल २०२४ चा लिलाव पाहत होता. स्वतःला सर्वात महागडा खेळाडू ठरताना पाहून तो तोंड लपवताना दिसला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२४ साठी, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत नितीश रेड्डीला आपल्या संघात समाविष्ट केले होते. या युवा अष्टपैलू खेळाडूने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १५० च्या वर स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना २३९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ३ विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटने चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात नितीशने ४२ चेंडूत ३ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या होत्या.
नितीशची आतापर्यंतची क्रिकेॉ कारकीर्द –
जर आपण नितीश कुमार रेड्डी यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, तो आंध्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत असताना, तो भारत-बी संघाचाही एक भाग होता. नितीशने २०२० मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यानंतर त्याने आतापर्यंत १७ सामने खेळले आहेत आणि २८ डावांमध्ये २०.९६ च्या सरासरीने ५६६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये नितीशने १६ सामन्यात ३६.७७ च्या सरासरीने ३३१ धावा केल्या आहेत.