SRH vs LSG IPL 2025 Nitish Reddy Throw Helmet in Anger video: लखनौच्या संघाने हैदराबादच्या संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा मोठा निर्णय घेतला. लखनौच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या टॉप ऑर्डरला म्हणजेच अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशन यांना मोठी धावसंख्या करू दिली नाही. पण जेव्हा नितीश रेड्डी चांगली फलंदाजी करत होता तेव्हाच रवी बिश्नोईने त्याला क्लीन बोल्ड करत संघाला पाचवा धक्का दिला. यानंतर रेड्डीने रागात हेल्मेट फेकल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

बिश्नोईच्या षटकात क्लीन बोल्ड झाल्यानंतर रेड्डी चांगलाच वैतागला आणि त्याने ड्रेसिंग रुममध्ये जाताना रागाच्या भरात हेल्मेट फेकून दिले. रेड्डीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादला लखनौच्या गोलंदाजांनी चांगलाच लगाम घातला होता आणि संपूर्ण संघ ९ विकेट्स गमावत १९० धावा करू शकला.

हैदराबादच्या टॉप ऑर्डरने झंझावाती सुरुवात करण्याचा प्रयत्न करताना विकेट्स गमावल्या आणि ७६ धावांच्या आत संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या नितीश रेड्डीने सावध खेळ करत २७ चेंडूंत दोन चौकारांसह ३२ धावा केल्या होत्या. ३ विकेट्स गेल्यानंतर नितीश रेड्डी आणि हेनरिक क्लासेन फलंदाजी करत होते. क्लासेन फटकेबाजी करत होता तर नितीशने संघाचा डाव एका बाजूने धरून ठेवला होता.

दोघेही ताळमेळ साधत चांगली फलंदाजी करत होते, तितक्यात १२ व्या षटकात अखेरच्या चेंडूवर क्लासेन धावबाद झाला. प्रिन्स यादवच्या चेंडूवर नितीश रेड्डीने सरळ फटका खेळला. प्रिन्स तो चेंडू टिपण्यासाठी पुढे गेला पण चेंडू त्याच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडच्या विकेट्सवर जाऊन आदळला आणि दरम्यान क्लासेनही क्रिझच्या बाहेर होता आणि अशारितीने लखनौला चौथी महत्त्वाची विकेट मिळाली.

नितीश रेड्डीने रागाच्या भरात हेल्मेट का फेकलं?

क्लासेन दुर्देवीरित्या धावबाद झाल्यानंतर नितीश रेड्डीवर संघाच्या धावांची जबाबदारी होती, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि १५व्या षटकातील रवी बिश्नोईच्या पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. पॅव्हेलियनमध्ये जातानाच रेड्डी स्वत:वरच प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने ड्रेसिंग रूमच्या पायऱ्यांवर हेल्मेट आदळले.

सनरायझर्स हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड ४७ धावा करत बाद झाल्यानंतर कोणताच फलंदाज मैदानात फार काळ टिकू शकला नाही. अनिकेत वर्मा आणि पॅट कमिन्स यांनी काही मोठे फटके खेळत धावांमध्ये भर घातली, पण संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकले नाही. तर प्रत्युत्तरात लखनौ संघाने २४ चेंडू शिल्लक ठेवत ५ विकेट्सने विजय नोंदवला.