IPL 2025 RR vs CSK Nitish Rana Fifty Celebration: राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर संघाचा अखेरचा सामना खेळला जात आहे. सलग दोन पराभवांसह मैदानात उतरलेल्या राजस्थानसमोर या सामन्यात सीएसकेचं आव्हान आहे. रियान परागच्या नेतृत्त्वाखाली या सामन्यात राजस्थानचा संघ सीएसकेसमोर नाणेफेक गमावत फलंदाजीसाठी उतरला आहे. या सामन्यात नितीश राणाची बॅट चांगलीच तळपली आहे आणि त्याने संघाला चांगली सुरूवात करून दिली.

गुवाहाटीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा फलंदाज नितीश राणाने पॉवरप्लेमध्ये स्फोटक अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान नितीशने नेहमीप्रमाणे अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर जोरदार हल्ला चढवला आणि चेन्नईच्या इतर गोलंदाजांविरूद्धही फटकेबाजी केली.

राजस्थानला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. संघाच्या खराब कामगिरीचे एक कारण फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड देखील होते. गेल्या मोसमात राजस्थानसाठी चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा रियान पराग या दोन्ही सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळला. दुसरीकडे कोलकाताकडून अनेक मोसमात तिसऱ्या क्रमांकावर दमदार फलंदाजी करणाऱ्या नितीश राणाला चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरवले जात होते. या निर्णयांमुळे राजस्थानचे नुकसान झाले आणि या दोन्ही सामन्यात दोन्ही फलंदाज अपयशी ठरले होते. मात्र या सामन्यात ही चूक दुरूस्त करताच संघाला फायदा झाला.

त्यानंतर चौथ्या षटकात रविचंद्रन अश्विन गोलंदाजीला आला आणि नितीशने कहर केला. या डावखुऱ्या फलंदाजाने सलग २ षटकार आणि १ चौकार लगावला. यापैकी एक षटकार अगदी सीमारेषेजवळ ठेवलेल्या कारच्या पोडियमलाही लागला. कारचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्यानंतर सहाव्या षटकात त्याने खलील अहमदवर दोन चौकार आणि एक षटकार खेचला. यासह नितीशने अवघ्या २१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गेल्या मोसमापर्यंत कोलकाताचा भाग असलेल्या नितीशला यावेळी राजस्थानने विकत घेतले आणि या फ्रँचायझीसाठी त्याचे हे पहिले अर्धशतक आहे.

नितीशने अर्धशतक झळकावताच त्याने बॅटचा पाळणा करत सेलिब्रेशन केले त्यानंतर त्याने फ्लाईंग किसही दिली. नितीशचे हे खास सेलिब्रेशन त्याच्या होणाऱ्या बाळासाठी आहे. नितीश राणा आणि त्याची पत्नी साची मारवाह लवकरच आई-बाबा होणार आहेत. याची माहिती नितीशने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली होती.

नितीश ३६ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह ८१ धावा करून बाद झाला. आयपीएलच्या इतिहासात अश्विनला नितीशची विकेट घेण्यात यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र असे असतानाही नितीशने महान भारतीय फिरकीपटूविरुद्ध आपला उत्कृष्ट विक्रम कायम राखला.