IPL 2025 RCB vs RR Nitish Rana Catch Video: आरसीबीने यंदाच्या आय़पीएलमध्ये घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगली धावसंख्या उभारली आहे. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या ७० धावा आणि देवदत्त पड्डिकलच्या अर्धशतकाच्या जोरावर २०४ धावांचं मोठं आव्हान राजस्थानला दिलं आहे. या सामन्यातील पहिल्या डावात नितीश राणाने असा झेल टिपला की सर्व पाहतच राहिले. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली तर देवदत्त पड्डिकल पुन्हा एकदा शानदार फॉर्मात दिसला. पड्डिकल २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा करत बाद झाला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर पड्डिकल झेलबाद झाला. संदीप शर्माच्या या १७व्या षटकात आरसीबीने दोन मोठे विकेट गमावले होते.
संदीप शर्मा १७ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्याने स्लोअर बॉल टाकला पण तो वाईडसाठी गेला. यानंतर पहिल्या लीगल चेंडूवर देवदत्त फटका खेळण्यासाठी गेला आणि नितीश राणाकडून झेलबाद झाला. पण नितीशसाठी हा झेल सोपा नव्हता. नितीशने तब्बल ६ प्रयत्नांनंतर हा झेल अखेरीस टिपला आणि राजस्थानला विकेट मिळवून दिली. स्टेडियममधील लाईट्समुळे नितीश झेल टिपताना थोडा गडबडला.
संदीप शर्माच्या षटकात आरसीबीने देवदत्त पड्डिकल आणि रजत पाटीदार यांच्या विकेट गमावल्या. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार फक्त १ धावा करत बाद झाला. रजत पाटीदार गेल्या काही सामन्यांमध्ये धावा करू शकलेला नाही. पण आरसीबीने घरच्या मैदानावर २०५ धावांचा टप्पा गाठण्यात यश मिळवले.
आरसीबीने यंदाच्या मोसमात चिन्नास्वामीच्या मैदानावर एकही सामना जिंकलेला नाही. राजस्थान रॉयल्सविरूद्ध आरसीबी घरच्या मैदानावरील पहिला विजय मिळवणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.