नवी मुंबईमधील डी. व्हाय. पाटील मैदानामध्ये रंगलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यामध्ये चेन्नई या पर्वातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यामधील खेळाडूंच्या दमदार खेळीबरोबरच एका चाहतीचीही तुफान चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. मुंबईमध्ये झालेल्या या सामन्यात धोनी आणि कोहलीसाठी मुंबईकर क्रिकेट चाहते चेअरअप करत असतानाच या महिलेने हातात पकडलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. क्रिकेटपटू अमित मिश्रानेही हा फोटो ट्विट करत त्यावर मजेदार प्रिक्रिया दिलीय.
सीएसके विरुद्ध आरसीबी सामना पाहण्यासाठी आलेली ही माहिला विराट कोहलीच्या बंगळुरु संघाला समर्थन देत होती. मात्र आपलं समर्थन देताना तिने हे केवळ या सामन्यापुरतं मर्यादित न ठेवता थेट आरसीबीबद्दल एक मोठी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे आरसीबीच्या संघाला ही गोष्ट साध्य करता येत नाही तोपर्यंत आपण खासगी आयुष्यातील लग्नासारखा महत्वाचा निर्णय घेणार नाही असंही म्हटलंय.
“आरसीबीचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही,” असं या महिलेने पोस्टवर लिहिलं होतं. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या महिलेला अजून बरीच वर्ष लग्न न करता रहावं लागेल अशा अर्थाच्या मजेदार प्रतिक्रिया हा फोटो शेअर करत दिल्यात.
१) तुम्ही तिच्या भविष्यासोबत खेळताय…
२) मला विचारल्यावर हेच सांगणार
३) मस्त प्लॅन आहे
भारताची फिरकीपटू अमित मिश्रानेही हा फोटो मजेदार कॅप्शनसहीत शेअर केलाय. “मला आता या महिलेच्या पालकांची फार चिंता वाटतेय,” असं अमित मिश्रा म्हणालाय.
आरसीबीला आतापर्यंत एकही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. या पोस्टरच्या माध्यमातून अनेकांनी आरसीबीला आता तरी कप जिंका अशीही मजेदार विनंती केल्याच दिसून येत आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये चेन्नईने २१६ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुला केवळ १९३ धावांपर्यंत मजल मारता आली आणि चेन्नईने हा सामना २३ धावांनी जिंकला.