१८ एप्रिल २००८. बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम. भारताने टी२० वर्ल्डकप जिंकून जेमतेम काही महिने झाले होते. देशाकडून खेळताना एकमेकांविरुद्ध उभे ठाकणारे खेळाडू सहकारी होऊन कसे खेळतील असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. आयपीएलचं सूप वाजलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना होता. ब्रेंडन मॅक्युलमने झंझावाती शतक झळकावत नव्या युगाची नांदी करून दिली.

बंगळुरूचा कर्णधार राहुल द्रविडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाचा माजी सौरव गांगुली आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनी कोलकाताला ६१ धावांची सलामी दिली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग मैदानात उतरला. २० धावा करून तो तंबूत परतला. डेव्हिड हसी आणि मोहम्मद हफीझ यांनी छोट्या, उपयुक्त खेळी केल्या पण चर्चा एकाच माणसाची झाली ती म्हणजे ब्रेंडन मॅक्युलम. मॅक्युलमने १० चौकार आणि १३ षटकारांसह ७३ चेंडूत नाबाद १५८ धावांची तडाखेबंद खेळी केली. कोलकातातर्फे झहीर खान, अॅशले नॉफक आणि जॅक कॅलिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बंगळुरूच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. प्रवीण कुमारच्या १८ धावांचा अपवाद वगळता बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कोलकातातर्फे अजित आगरकरने ३ तर अशोक दिंडा आणि सौरव गांगुली यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. अफलातून शतकी खेळी साकारणाऱ्या मॅक्युलमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

या सामन्यात खेळलेले विराट कोहली आणि इशांत शर्मा यंदाच्या आयपीएलचा भाग आहेत. आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या ४ खेळाडूंमध्ये विराटचा समावेश होतो. स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघ- सौरव गांगुली (कर्णधार), ब्रेंडन मॅक्युलम, रिकी पॉन्टिंग, डेव्हिड हसी, मोहम्मद हफीझ, लक्ष्मीरतन शुक्ला, वृद्धिमान साहा, अजित आगरकर, अशोक दिंडा, मुरली कार्तिक, इशांत शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ- राहुल द्रविड (कर्णधार), वासिम जाफर, विराट कोहली, जॅक कॅलिस, कॅमेरुन व्हाईट, मार्क बाऊचर, बालचंद्र अखिल, अॅशले नॉफक, प्रवीण कुमार, झहीर खान, सुनील जोशी.