Indian Cricketers Emotional Post on Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण आहे. आतंकवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनीदेखील याबाबत शोक व्यक्त करत या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला.
सध्या भारतात आयपीएलचे सामने खेळवले जात असून सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. पण घटनेबद्दल पोस्ट करत खेळाडूंनी आपला निषेध व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आणि जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दोघांनीही ऑल आईज ऑन पहलगाम हा फोटोही शेअर केला.
मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गृहमंत्री अमित शहा यांचा मृतांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेअर केला. त्यांने लिहिले की, “पहलगाममधील भयानक आणि धक्कादायक दहशतवादी हल्ल्याबाबत वाचलं. धर्माच्या नावाखाली निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं आणि त्यांची हत्या करणं हे अत्यंत वाईट आहे. कोणतंही कारण, कोणताही विश्वास, कोणतीही विचारसरणी अशा राक्षसी कृत्याचे कधीही समर्थन करू शकत नाही. हा कसला वाद आहे? जिथे माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही.”
सिराजने पुढे लिहिले, “त्या कुटुंबांना किती वेदना होत असतील याची तर मी कल्पनाही करू शकत नाही. कुटुंबांना या असह्य दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो. मला आशा आहे की हे सगळं लवकरच संपेल आणि या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना कोणतीही दया माया न दाखवता त्यांना शिक्षा केली जाईल.”
मोहम्मद सिराजव्यतिरिक्त भारतीय संघाच्या आजी माजी सर्व खेळाडूंनी या ह्रदयद्रावक घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, मोहम्मद शमी या व अशा अनेक खेळाडूंनी पोस्ट शेअर केल्या आहेत. याशिवाय आयपीएलमधील सर्वच संघांनी पहलगाममधील या हल्ल्याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत.