Pahalgam Terror Attack IPL 2025 SRH vs MI Match: भारतातील नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवादी हल्ला करण्यात आला आणि या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अनेक निष्पाप लोकांना आपला विनाकारण जीव गमवावा लागला आहे. दरम्यान भारतात सध्या आयपीएल २०२५ स्पर्धा खेळवली जात आहे. या घटनेमुळे बीसीसीआयने या स्पर्धेदरम्यान काही मोठे निर्णय घेतले आहेत.

पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने काही निर्णय घेतले आहेत. या भयानक घटनेनंतर, आयपीएल २०२५ मध्ये आज होणाऱ्या सामन्यादरम्यान मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. या लीगचा ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की या सामन्यादरम्यान मैदानावर कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा केला जाणार नाही आणि संपूर्ण सामना अत्यंत शांततेत खेळला जाईल.

हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान, दोन्ही संघ हातावर काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरतील आणि या सामन्यादरम्यान चीअरलीडर्सचा डान्सदेखील नसणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, या सामन्यात सहभागी होणारे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून मैदानात येतील तर चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा विकेट पडल्यानंतर चीअरलीडर्स देखील डान्स करताना दिसणार नाहीत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले जाईल. याशिवाय सामना संपल्यानंतर फटाकेही फोडले जाणार नाहीत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २८ भारतीयांची गोळ्या घालून हत्या केली होती.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात एकूण २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हल्ल्यापूर्वी दहशतवादी बनावट गणवेश घालून फिरत होते, त्यामुळे कोणत्याही पर्यटकाला त्यांच्यावर संशय आला नाही, असे सांगण्यात येत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.