आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील लढती चांगल्याच रोमहर्षक होत आहेत. सध्या आयपीएलचे अर्धे सामने संपले आहेत. आता क्रिकेट चाहत्यांना फायनलपर्यंत कोण पोहोचणार याची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या निमित्ताने काही खेळाडू त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे आणि आठवणीत असणारे प्रसंग सांगत आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू सलमान बटने केकेआरचा सहमालक शाहरुख खानसोबतच्या काही आठवणी तसेच तो खेळाडूंसोबत कसे वागतो याबद्दलही सांगितले आहे.
हेही वाचा >> प्रसिध कृष्णाकडून मोठी चूक, ट्रेंट बोल्ट झाला असता गंभीर जखमी, पाहा KKR vs RR सामन्यात काय घडलं?
आयपीएलची सुरुवात २००८ सालापासून झाली. या हंगामात पाकिस्तानी खेळाडूदेखील सामील होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट यावेळी केकेआर संघाकडून खेळत होता. शाहरुख खानने संघाला कशी प्रेरणा दिली याबद्दल बटने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सविस्तरपणे सांगितले आहे. “एकदा शाहरुख खानने सर्वच खेळाडूंना हेल्मेट दिलं. ड्रेंसिंग रुममध्ये सर्व खेळाडू सोफ्यावर बसलेले होते. शाहरुख खान मात्र किटवर झोपला होता. शाहरुख सर्वच खेळाडूंसोबत गप्पा मारत होते. संघाचा मालक असल्याचा कोणताही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता,” अशी आठवण सलमान बटने सांगितली.
हेही वाचा >> आयपीएलच्या अंतिम सामन्याचं ठिकाण ठरलं, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार थरार!
तसेच “त्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांत आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र अशा कठीण काळात शाहरुख खानने खेळाडूंना प्रेरित केलं. मी पाच सामने झाल्यानंतर केकेआर संघात सामील झालो होतो. मी संघात सामील झालो तेव्हा कोलकाताचे सात किंवा आठ सामने बाकी होते. यातील दोन ते तीन सामन्यांमध्येही केकेआरचा पराभव झाला होता. यावेळीदेखील शाहरुख खानने खेळाडूंची बैठक बोलवत त्यांना प्रेरित करण्याचं काम केलं. शाहरुखने आमच्याशी १५ ते २० मिनिटे संवाद साधला,” असेदेखील सलमान बटने सांगितले.
हेही वाचा >> “१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण
दरम्यान, सध्याच्या आयपीएलमध्ये केकेआर संघाने आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत. यातील फक्त चार सामनेच केकेआरला जिंकता आले आहेत. केकेआरला प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील सर्व म्हणजेच चार सामने जिंकावे लागतील.