Pahalgam Terror Attack Updates: जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे पर्यटकांवर अमानुष पद्धतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता देशात पाकिस्तान सुपर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यात २६ जणांनी जीव गमावला. राज्यातल्या सहाजणांचा यामध्ये समावेश आहे.
या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधी लाटच उसळली. याचा परिणाम म्हणून पाकिस्तान सुपर लीगचं देशातलं प्रक्षेपण बंद झालं आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होते. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आयपीएल काळातच पीएसएलचे सामने सुरू झाले. भारतात फॅनकोड अॅपवर सामन्याचं प्रक्षेपण होत होतं.
फॅनकोडने पीएसएलच्या १३ सामन्यांचं प्रक्षेपण दाखवलं. शुक्रवारी सकाळी फॅनकोड अॅपवर पीएसएलसंदर्भात लिंकवर क्लिक केल्यानंतर एरर असा मेसेज येतो आहे. अॅपवर तूर्तास तरी पीएसएलसंदर्भात कोणतंही कंटेट उपलब्ध नाही. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण सुरू ठेवल्याने फॅनकोडवर सोशल मीडियावर टीका झाली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानसंदर्भात कठोर पावलं उचलत पाच मोठे निर्णय घेतले होते. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश मिळणार नसल्याचंही सरकारने स्पष्ट केलं होतं.
केंद्र सरकारने १९६०चा सिंधू पाणी करारही स्थगित केला. पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कायम राहील असं भारताने स्पष्ट केलं आहे. संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला. राजधानी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्यायुक्तातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी आठवडाभरात भारत सोडावा असंही केंद्र सरकारने सांगितलं.
याव्यतिरिक्त भारताने इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून स्वत:चे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट् सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती.