IPL 2025 PBKS vs CSK Highlights in Marathi: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जने घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने गेल्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. पंजाब किंग्सने घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला आहे. पंजाब किंग्सच्या शिलेदारांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजयाची नोंद केली.

मुल्लानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, २४ वर्षीय युवा फलंदाज प्रियांश आर्यने वादळी शतक झळकावून संघाचे लक्ष वेधून घेतले आणि संघाला २१९ धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. चेन्नईसाठी ही धावसंख्या खूप मोठी ठरली आणि संघ फक्त २०१ धावाच करू शकला. यासह, चेन्नईला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जने घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने गेल्या सामन्यातील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले आणि चेन्नई सुपर किंग्जचा १८ धावांनी पराभव केला.

पंजाबने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांना सूर गवसला आणि त्यांनी चांगली सुरूवात करून दिली. रचिन रवींद्र ३६ धावा करत स्टम्पिंगवर बाद झाला. तर डेव्हॉन कॉन्वेने संघाला चांगली सुरूवात करून देत अर्धशतकी खेळी केली. कॉन्वे ४९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६९ धावा करत रिटायर्ड आऊट झाला. तर शिवम दुबेने २७ चेंडूत ४२ धावांची शानदार खेळी केली.

धोनी २७ धावा करत अखेरच्या षटकात झेलबाद झाला आणि पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. पंजाबकडून लॉकी फर्ग्युसनने २ विकेट्स घेतले. तर यश ठाकूर आणि मॅक्सवेलने १-१ विकेट घेतली. पंजाब संघाने या सामन्यात ३-४ कॅच ड्रॉप केल्या, ज्याचा त्यांना फटका बसला पण अखेरीस संघाने विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने या मैदानावर आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. प्रियांशने पहिल्याच षटकात दोन षटकार मारून आप आक्रमक फलंदाजीचा नमुना दिला पण दुसऱ्या टोकाकडून संघ सातत्याने विकेट गमावत होता. पॉवरप्लेमध्येच संघाच्या ३ विकेट्स पडल्या आणि ८ व्या षटकापर्यंत निम्मा संघ माघारी परतला होता, तर धावसंख्या फक्त ८५ होती. तर बाद झालेल्या फलंदाजांचे योगदान फक्त २३ धावांचे होते.

यानंतर प्रियांशने प्रथम १९ चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावले आणि नंतर १३ व्या षटकात, त्याने मथिशा पाथिरानाच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार आणि एक चौकार लगावत केवळ ३९ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ शशांक सिंग (नाबाद ५२) आणि मार्को यानसेन (नाबाद ३४) यांनी ६५ धावांची भागीदारी करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.