IPL 2025 PBKS vs KKR Highlights in Marathi: पंजाब किंग्सने केकेआरवर घरच्या मैदानावर चित्तथरारक विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने केकेआरचा १६ धावांनी पराभव करत आयपीएलमधील ऐतिहासिक विदयाची नोंद केली आहे. श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्स संघाने आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आयपीएलमधील सर्वाेत्कृष्ट गोलंदाज युझवेंद्र चहलने सामन्याचा चेहरामोहरा बदलला.

पंजाब किंग्सने ११२ धावांचा बचाव करत केकेआरला १५.१ षटकांत ९५ धावांवर सर्वबाद केलं. मार्काे यान्सनच्या १६व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आंद्रे रसेल क्लीन बोल्ड झाला. आंद्रे रसेलच्या खांद्यावर संघाच्या विजयाची पूर्ण जबाबदारी होती. केकेआरला विजयासाठी ५ षटकांत १७ धावांची गरज होती, तर पंजाबला एका विकेटची गरज होती. अखेरीस रसेलला क्लीन बोल्ड करत पंजाबने बाजी मारली.

केकेआरने दिलेल्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाची सुरूवात फारच खराब झाली. पहिल्याच षटकात सुनील नरेन यान्सनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर पुढच्याच षटकात बार्टलेटच्या गोलंदाजीवर क्विंटन डि कॉक झेलबाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी चांगली भागीदारी रचली. पण युझवेंद्र चहलने अजिंक्य रहाणेला पायचीत करत ही भागीदारी तोडली. यानंतर मॅक्सवेल आणि चहलने झटपट फलंदाजांना बाद करत पंजाबला सामन्यात कायम ठेवलं.

पंजाब किंग्सचे फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मार्को यान्सेन यांच्यासमोर केकेआर संघ टिकू शकला नाही. ११२ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना केकेआरचा संघ फक्त ९५ धावांवर गारद झाला. केकेआरला सर्वात मोठा धक्का युजवेंद्र चहलने दिला, ज्याने ४ षटकांत २८ धावा देत ४ विकेट घेतले. मार्को यानसेननेही फक्त १७ धावा देऊन ३ विकेट घेतले. पंजाब किंग्सने केकेआरविरुद्ध १११ धावांच्या धावसंख्येचा बचाव करून इतिहास रचला. आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करणारा संघ बनला आहे.

पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. पण केकेआरने पंजाबच्या इतर फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. प्रियांश आर्य २२ धावा करत बाद झाला. तर श्रेयस अय्यर येताच खातेही न उघडता झेलबाद झाला. जोश इंग्लिसही आपली कामगिरी चोख बजावू शकला नाही आणि २ धावा करत बाद झाला. नेहल वधेरा १० धावा करत बाद झाला.

यानंतर मॅक्सवेल ७ धावा, सूर्यांश शेडगे ४ धावा, शशांक सिंगने १८ धावा करत बाद झाला. बार्टलेटने ११ धावांचं योगदान दिलं. केकेआरकडून हर्षित राणाने ३ विकेट्स, वरूण चक्रवर्ती आणि नरेन २-२ विकेट्स घेतले. याशिवाय नॉर्किया-वैभव अरोरा १-१विकेट घेतल्या.