राजस्थान रॉयल्सला अखेरच्या टप्प्यातील खराब कामगिरीचा पुन्हा एकदा फटका बसला. पंजाब किंग्सने राजस्थानकडून विजय हिसकावून घेत ६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. सॅम करनची ६३ धावांची नाबाद खेळी पंजाबसाठी निर्णायक ठरली. तर जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माने शानदार फटकेबाजीसह संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. राजस्थानला या पराभवाचा मोठा फटका बसणार आहे. या पराभवासह रॉयल्सचे क्वालिफायर १ खेळण्याचे स्वप्न तुटू शकते. कारण आजचा सामना गमावल्याने राजस्थान केवळ १८ गुणच मिळवू शकणार आहे. पण हैदराबादचे अजून दोन सामने बाकी आहेत. हैदराबादने दोन्ही सामने जिंकल्यास १८ गुणांसह ते दुसऱ्या स्थानी जाऊ शकतात. त्याचसोबत राजस्थानपेक्षा हैदराबादचा नेट रन रेटही चांगला आहे. त्यामुळे राजस्थानसाठी हा पराभव चांगलाच महागात पडू शकतो.
प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२४ मध्ये सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाने पहिल्या ९ सामन्यात ८ सामने जिंकले होते. १३ सामन्यांनंतरही त्याच्या नावावर केवळ ८ विजय आहेत. स्लो विकेटवर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ९ विकेट्सवर १४४ धावा केल्या. पंजाबने १९ व्या षटकातच हे लक्ष्य गाठले. पंजाब आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे, पण या विजयाने ते गुणतालिकेत १० व्या स्थानावरून ९व्या स्थानावर पोहोचले आहे.
पंजाबच्या डावाची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही. राजस्थानप्रमाणे संघ धावा करण्यासाठी धडपडताना दिसला. प्रभसिमरन सिंग ६ धावा करत बाद झाला. तर बेयरस्टोही १४ धावा करून परतला. यानंतर राईली रूसोने चांगली फलंदाजी करत २२ धावा केल्या, पण मोठी खेळी करू शकला नाही. त्यानंतर पंजाबला मोठा धक्का बसला तो म्हणजे शशांक सिंग खातेही न उघडता बाद झाला.
मात्र यानंतर आलेल्या सॅम करनने ४१ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह शानदार खेळी करत संघाला सामन्यात कायम ठेवले. त्याच्यासोबतच जितेश शर्मानेही २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत करनला मदत केली. तर नंतर आलेल्या आशुतोष शर्माने पुन्हा एकदा आपली फटकेबाजी दाखवून देत ११ चेंडूत १ चौकार आणि षटकारासह १७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून आवेश खान आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट घेतले. तर ट्रेंट बोल्टला १ विकेट घेता आली.
तत्त्पूर्वी राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १४४ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल एक चौकार लगावत पहिल्याच षटकात ४ धावा करत बाद झाला. त्यानंकर कोहलर आणि सॅमसनने अवघ्या १८-१८ धावा करत स्वस्तात बाद झाले. त्यानंतर रियान पराग एकटा लढला, ज्याने ३४ चेंडूत ६ चौकारांसह ४८ धावा केल्या, तर अश्विनने २८ धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर सर्व फलंदाज धावा करण्यासाठी धडपडताना दिसत होते. पंजाबच्या शानदार गोलंदाजीपुढे राजस्थानचा संघ चांगलाच गडबडला. पंजाबकडून राहुल चहर, हर्षल पटेल, सॅम करन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप आणि नाथन एलिसने १-१ विकेट मिळवली.