IPL 2022 च्या यंदाच्या हंगामातील १६ वा सामना गुजरात आणि पंजाबमध्ये (PBKS vs GT) खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्याचा निकाल अखेरच्या दोन चेंडूंमध्ये फिरला. गुजरातला अखेरच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना राहुल तेवतियाने अनपेक्षितपणे सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकला. सामना हातातून गेला असं समजून बसलेले गुजरातचे चाहते आणि सामना जिंकला असा विश्वास बसलेल्या पंजाबचे चाहते अशा दोन्ही चाहत्यांना हे दोन षटकार धक्का देऊन गेले. अत्यंत आश्चर्याकारकपणे गुजरात टायटन्सने हा सामना जिंकला.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने २० षटकात ९ बाद १८९ धावा केल्या. यानंतर गुजरातने ६ विकेट राखत अखेरच्या २ चेंडूवर षटकार लगावत १९० धावा केल्या आणि सामना आपल्या खिशात टाकला.
राहुलच्या तुफान फलंदाजीचं रितेश देशमुखने देखील कौतुक केलं.
पंजाबची फलंदाजी
मयांक अग्रवाल ९ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पंड्याने बाद केलं. जॉनी बेयरस्टोने ८ चेंडूत ८ धावा केल्या. त्याला लोकी फर्गसनने बाद केलं. पंजाबला तिसरा झटका शिखर धवनच्या रुपात मिळाला. शिखर धवनने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. त्याला रशिद खानने बाद केलं. लियाम लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. जितेश शर्माने ११ चेंडूत २३ धावांची खेळी केली. ओडेन स्मिथला तर आपलं खातही खोलता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर तंबुत परतला. शाहरुख खानने ८ चेंडूत १५ धावा काढल्या. रबाडालाही एकच धाव करता आली, तर वैभव अरोराने २ धावा केल्या. राहुल चहर आणि अर्शदीप सिंह नाबाद राहिले. चहरने १४ चेंडूत २२ धावा, तर अर्शदीपने ५ चेंडूत १० धावा केल्या.
गुजरातची फलंदाजी
१९० धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने ५९ चेंडूत तुफान फटकेबाजी करत ९६ धावा केल्या. साई सुदर्शनने ३० चेंडूत ३५ धावा, तर हार्दिक पंड्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. मॅथ्यू वेडने ७ चेंडूत ६ धावा केल्या. हा सामना गुजरातच्या खिशात घालण्यात जेवढी मोठी भूमिका शुभमन गिलची राहिली तेवढीच मोठी भूमिका अखेरच्या दोन चेंडूत सामना फिरवणाऱ्या राहुल तेवतियाची राहिली. राहुलने अखेरच्या दोन चेंडूत १२ धावा लागत असताना तुफान फटकेबाजी करत सलग दोन षटकार मारले आणि सामना गुजरातच्या खिशात घातला.
गुणतालिकेत कोणता संघ कोठे?
गुजरातने या विजयासह सामना जिंकण्याची हॅट्रिक केली. आतापर्यंत ३ पैकी ३ सामने जिंकत गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज या पराभवासह चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर गेलाय. पंजाबने आतापर्यंत ४ सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला.
दोन्ही संघात काय बदल?
गुजरातच्या संघात दोन बदल करण्यात आले. विजयशंकर आणि वरुण आरोन यांच्या जागेवर साईं सुदर्शन आणि दर्शन नालकंडे यांना संधी देण्यात आली आहे. पंजाबच्या संघात एक बदल करण्यात आला. भनुका राजपक्षेच्या जागेवर जॉनी बेयरस्टोला संधी देण्यात आली आहे.
पंजाब किंग्जचे प्लेईंग ११ (Punjab Kings Playing XIs) –
मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ओडेन स्मिथ, अर्शदीप सिंह, राहुल चहर, कगिसो रबाडा, वैभव अरोरा
हेही वाचा : १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवल्याचा चहलचा अनुभव ऐकताच सेहवागची मोठी मागणी, म्हणाला, “हे खरं असेल तर…”
गुजरात टायटन्स प्लेइंग ११ (Gujarat Titans Playing XIs) –
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक) राहुल तेवतिया, साईं सुदर्शन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, रशिद खान, दर्शन नालकंडे, लोकी फर्गसन, मोहम्मद शमी</p>