PBKS vs KKR IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सने चांगली सुरूवात केली होती. परंतु संघाला काही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्सचा संघात एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ज्यांनी वेळोवेळी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. पण यादरम्यान संघाचा महत्त्वाचा गोलंदाज मात्र केकेआरविरूद्ध सामन्यापूर्वी स्पर्धेबाहेर झाला आहे.

पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. आता त्याला आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होणं कठीण असल्याची माहिती समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात गोलंदाजी करताना लॉकीच्या पायामध्ये अचानक वेदना झाल्या आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला अन् पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही.

दरम्यान पंजाब संघाचे सहाय्यक प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले की,त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली आणि त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल याबद्दल अद्याप फारशी कल्पना नसल्याचेही सांगितले.

लॉकी फर्ग्युसनने त्याने ३ डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत आणि या हंगामात त्याचा इकॉनॉमी रेट ९.१६ आहे. फर्ग्युसन जवळजवळ स्पर्धेतून बाहेर पडला आहे, असं जेम्स म्हणाले. यानंतर पंजाब किंग्सने संघानेही पोस्ट करत तो स्पर्धेबाहेर गेल्याची माहिती दिली. इतकंचल नव्हे तर पंजाब किंग्स संघाकडे त्याची जागा घेईल अशी नॅचुरल रिप्लेसमेंट नसल्याचे कोच म्हणाला.

पंजाब किंग्स संघाला लॉकी फर्ग्युसनच्या जागी संघात कोणाचा समावेश करायचा असेल तर ते विजयकुमार वैशाख हा खेळाडू निवडू शकतात. विजयकुमार वैशाख हा पंजाब किंग्स संघाच्या पहिल्याच सामन्यातील विजयाचा हिरो ठरला होता.

पंजाब किंग्सच्या ताफ्यात एकापेक्षा एक खेळाडूंचा साठा आहे. पण प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले ग्लेन मॅक्सवेल आणि युझवेंद्र चहल मात्र फॉर्मात नाहीत. मॅक्सवेलने पाच सामन्यांमध्ये ३० धावा केल्या आहेत. तर ३ विकेट घेतल्या आहेत. तर चहलला फार प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. याशिवाय क्रिकेट तज्ञांनी पंजाबला जोश इंग्लिस आणि अजमतुल्ला ओमरझाई या खेळाडूंना संधी द्यावी असा सल्ला दिला आहे.

जोश इंग्लिसने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वादळी कामगिरी करत आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. तर अझमतुल्ला ओमरझाई एक चांगला अष्टपैलू खेळाडू, जो मधल्या षटकांमध्ये गोलंदाजीही करू शकतो आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी करतो. त्यामुळे आता पंजाबचा संघ केकेआरविरूद्ध सामन्यात कोणते बदल करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.