Phil Salt, Shimron Hetmyer Bat Inspection: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान, पंचांनी अचनाक खेळ थांबवत राजस्थानचा शिमरॉन हेटमायर आणि बंगळुरूच्या फिल साल्ट यांच्या बॅटची तपासणी केल्याने या घटनेबाबत सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
राजस्थानच्या डावाच्या १६ व्या षटकाच्या शेवटी, सलामीवीर यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर लगेचच, हेटमायर फलंदाजीला आला. हेटमायर ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर येताच पंचांनी हेटमायरची बॅट तपासण्यासाठी खेळ थांबवला. यानंतर पंचांनी बॅट गेज (बॅटचा आकार मोजण्याचे उपकरण) वापरून, हेटमायरची बॅट अधिकृत आयपीएल मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसते की नाही हे पडताळले. या ही घटना लक्षात येताच मैदानासह मैदानाबाहेरही चाहत्यांमध्ये याबाबत चर्चा रंगल्या.
बॅटच्या आकाराचे नियम
ही तपासणी आयपीएलच्या प्लेइंग कन्डीशन्सच्या नियम ५.७ अंतर्गत करण्यात आली, ज्यामध्ये बॅट आकार नियमांमध्ये बसणे आवश्यक आहे. नियमांनुसार, बॅटची, हँडलसह, एकूण लांबी ३८ इंच (९६.५२ सेमी) पेक्षा जास्त नसावी. याचबरोबर ब्लेडची रुंदी ४.२५ इंच (१०.८ सेमी), खोली २.६४ इंच (६.७ सेमी) आणि कडा १.५६ इंच (४.० सेमी) पेक्षा जास्त असू नयेत.
याव्यतिरिक्त, हँडल बॅटच्या एकूण लांबीच्या ५२% पेक्षा जास्त नसावे. कव्हरिंग मटेरियल ०.०४ इंच (०.१ सेमी) च्या आत असले पाहिजे. तसेच बॅट अधिकृत बॅट गेजमधून विना अडथळा जाणे देखील आवश्यक आहे. दरम्यान या तपासणीनंतर हेटमायरची बॅट नियमांमध्ये बसत असल्याचे आढळले.
दरम्यान आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टच्या बॅटचीही त्यांचा डाव सुरू होण्यापूर्वी अशीच तपासणी केली. त्यामध्ये त्याची बॅटही नियमांमध्ये बसत असल्याचे आढळले.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईची तरतूद
जरी या तपासण्या नियमित असल्या आणि आयपीएल नियमांनुसार त्यावर कोणताही थेट दंड आकारला जात नाही. नियमांचे पालन न केल्यास खेळाडूंना केवळ बॅट बदलावी लागते. पण, सातत्याने अशाप्रकारचे उल्लंघन केल्यास याचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात.
२०२३ च्या इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स संघाच्या फिरोज खुशीच्या बॅटचा आकार नियमांमध्ये बसत नसल्यामुळे एसेक्सचे १२ गुण कमी करण्यात आले होते.
© IE Online Media Services (P) Ltd