Mohsin Khan Video Call Photo Viral: मंगळवारी आयपीएल २०२३ चा ६३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यात लखनऊने मुंबईचा ५ धावांनी पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान लखनौच्या या विजयाचा नायक होता, त्याने अखेरच्या षटकात शानदार गोलंदाजी करत संघाला स्पर्धेतील सातवा विजय मिळवून दिला. त्याचवेळी, सामन्यानंतर मोहसीन व्हिडीओ कॉलद्वारे आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका खास व्यक्तीशी बोलताना दिसला. ज्याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अखेरच्या षटकात मोहसीनने फक्त पाच धावा दिल्या –
मुंबई इडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहसीन खानने मोक्याच्या क्षणी शानदार गोलंदाजी करत विजयात महत्वाची भूमिका निभावली. सामन्याच्या शेवटच्या षटकात, एमआयला विजयासाठी ११ धावांची गरज होती. त्यावेळी मोहसीनने फक्त पाच धावा दिल्या, ज्यामुळे एलएसजीने सामना जिंकला. २४ वर्षीय युवा गोलंदाज मोहसिनने आपल्या तीन षटकांच्या स्पेलमध्ये २६ धावा देत एक विकेट घेतली. या सामन्यानंतर मोहसीन आपल्या शानदार कामगिरीमुळे चर्चेत आहे.
व्हिडीओ कॉलद्वारे वडिलांशी साधला संवाद –
त्याचवेळी, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोहसीन व्हिडिओ कॉलद्वारे आयसीयूमध्ये दाखल असलेल्या त्याच्या वडिलांशी बोलत असल्याचे दिसत आहे. त्याने या घटनेचा फोटो त्याच्या चाहत्यांसह त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने वडिलांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोहसिनला आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत फक्त तीन सामने खेळता आले आहेत, ज्यामध्ये त्याने दोन विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे धर्मशाला येथे पारंपारिक नृत्यासह झाले भव्य स्वागत, पाहा VIDEO
विशेष म्हणजे या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने क्रृणाल पांड्या (४९) आणि मार्कस स्टॉयनिस (८९) यांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ३ गडी गमावून १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईकडून इशान किशन (५९), रोहित शर्मा (३७) आणि टीम डेव्हिड (३२) यांनी चांगली फलंदाजी केली, मात्र संपूर्ण षटक खेळल्यानंतरही संघाला ५ गडी गमावून १७१ धावाच करता आल्या.