आयपीएल हंगामाची जादू हळूहळू पसरत असतानाच सख्खे शेजारी पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएल आजपासून सुरू होत आहे. दरवर्षी ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. यंदा मात्र आयपीएल सुरू असतानाच पीएसएलचेही सामने सुरू होणार आहेत. यानिमित्ताने आयपीएल लिलावात नाकारलेले जवळपास तीन डझन खेळाडू पाकिस्तानात दाखल झाले आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन गेल्या वर्षीपर्यंत गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. लिलावात केनला ताफ्यात घेण्यात कोणीही स्वारस्य दाखवलं नाही. यंदाच्या हंगामात केन आयपीएलचं प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीसाठी तज्ज्ञ म्हणून मुंबईत आला होता. मात्र पाकिस्तान सुपर लीगचा भाग असल्याने केन पाकिस्तानात दाखल झाला आहे. केनप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आयपीएल लिलावात कोणीही बोली लावली नाही. वॉर्नरने मोर्चा बाजूच्या देशाकडे वळवला असून, तो पीएसएलमध्ये कराची किंग्ज संघाचं नेतृत्व करत आहे.
आयपीएल सुरू झालं तेव्हा पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंनी आयपीएलला प्राधान्य दिल्याने त्यांचा ब संघ खेळत होता. न्यूझीलंडच्या या संघानेही पाकिस्तानला वनडे आणि टी२० मालिकेत हरवलं. या संघातील बहुतांश खेळाडूंसाठी आयपीएल लिलावात बोली लागली नव्हती. हे सगळे आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरेल मिचेलला चेन्नई सुपर किंग्सने तब्बल १४ कोटींची बोली लावून संघात घेतलं होतं. मात्र मोठ्या लिलावापूर्वी चेन्नईने त्याला रिटेन केलं नाही. लिलावात त्याला संघात घेण्यासाठी कोणी स्वारस्य दाखवलं नाही. मिचेल आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसेल. मिचेलसह न्यूझीलंडचा हंगामी कर्णधार मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, टीम सैफर्ट, फिन अॅलन, कायले जेमिसन हे सगळे पाकिस्तान सुपर लीगमधल्या विविध संघांसाठी खेळताना दिसणार आहेत.
मिस्टर प्रेसिडेंट म्हणून ओळखला जाणारा अफगाणिस्तानचा अनुभवी मोहम्मद नबी गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग होता. लिलावापूर्वी मुंबईने त्याला रिटेन केलं नाही. लिलावात त्याच्यासाठी बोली लागली नाही. नबी आता पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळताना दिसेल. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर तसंच वनडे आणि टी२०चा नवा कर्णधार शे होप दोघेही पाकिस्तान सुपर लीगचा भाग आहेत. कर्णधारांच्या जोडगोळीसह अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन, गुदकेश मोटी हेही पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसतील. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मॅथ्यू शॉर्ट पंजाब किंग्जचा भाग होता. मात्र पंजाबने त्याला रिटेन केलं नाही, लिलावात त्याच्यासाठी बोली लागली नाही. त्यामुळे शॉर्ट आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसेल. श्रीलंकेचे कुशल परेरा आणि मेंडिस यांच्यासह मूळचा पाकिस्तानचा मात्र आता झिम्बाब्वेचा झालेला सिकंदर रझाही पाकिस्तान सुपर लीगचा हिस्सा आहे.
आयपीएलच्या माध्यमातून मिळणारा पैसा, संधी लक्षात घेता जगभरातले क्रिकेटपटू लिलावासाठी नोंदणी करतात. मात्र सगळ्यांचंच नशीब चांगलं नसतं. संघांकडे खर्चायला असलेली रक्कम, त्यांना कोणत्या पद्धतीचा खेळाडू हवा आहे, लिलावात खेळाडूचं नाव कधी आलं अशा अनेक गोष्टी नशीब बदलवतात. यंदाच्या लिलावात ३९५ खेळाडू अनसोल्ड गेले होते. यापैकी विदेशी खेळाडूंनी पीएसएलची वाट धरली आहे. आयपीएल काळात बाकी मालिका नसल्याने लिलावात अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंना पीएसएलच्या निमित्ताने आपला खेळ दाखवण्यासाठी व्यासपीठच मिळालं आहे. दरम्यान आयपीएलच्या सामन्यांच्या वेळातच पीएसएलचे सामने होत आहेत. पीएसएलच्या संयोजकांनी सामने रात्री ८ऐवजी ९ वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेशावर झाल्मीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कार्बिन बॉशला करारबद्ध केलं होतं. मात्र कार्बिनने पाकिस्तान सुपर लीगऐवजी आयपीएलची निवड केली. आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्स संघाने कार्बिनला ताफ्यात समाविष्ट केलं. या निर्णयामुळे पाकिस्तान सुपर लीगने कार्बिनवर एका वर्षाची बंदी घातली आहे. कार्बिनने यासंदर्भात पेशावर झाल्मी तसंच पाकिस्तान सुपर लीग आयोजक, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांची माफी मागितली आहे.