* मुंबईचा चेन्नई सुपर किंग्सवर ९ धावांनी विजय
* पोलार्डची ५७ धावांची खेळी निर्णायक* धोनीची एकाकी झुंज अपयशी
कठीण समय येता, कोण कामास येतो.. या उक्तीला जागत किरॉन पोलार्डने मुंबईला संकटातून तारले. ६ बाद ८३ अशा स्थितीतून पोलार्डने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत तुफान टोलेबाजी केली. पोलार्डच्या आतषबाजीमुळेच मुंबईने १४८ धावांची मजल मारली. फलंदाजीतील पोलार्डच्या प्रयत्नांना गोलंदाजीनीही साथ देत ठरावीक अंतराने विकेट्स मिळवल्या. याच कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनी बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सला चीतपट केले. चेन्नईला सहा चेंडूत १२ धावा हव्या असताना धोनीचा सीमारेषेवर थरारक झेल टिपत पोलार्डनेच मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संयमी खेळ करणाऱ्या मुरली विजय मुनाफ पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. भरवशाच्या सुरेश रैनाला मिचेल जॉन्सनने बाद केले. सातत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माइक हसीचा हरभजनने काटा काढला. ड्वेन ब्राव्हो आणि एस. बद्रिनाथला प्रग्यान ओझाने बाद केले. जडेजा, अश्विन हे दोघेही धोनीला साथ देण्यात अपयशी ठरले. चेन्नईला २० षटकांत ९ बाद १३९ धावाच करता आल्याने मुंबईने ९ धावांनी विजय साकारला.
तत्पूर्वी किरॉन पोलार्डच्या ३८ चेंडूतील ५७ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने ६ बाद १४८ धावसंख्या उभारली. मुंबईची सुरुवात खराब झाली. डर्क नॅन्सच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर सचिन तेंडुलकर पायचीत झाला. सचिनपाठोपाठ मुंबईचा कर्णधार रिकी पॉन्टिंगही माघारी परतला. ड्वेन ब्राव्होच्या आत येणाऱ्या चेंडूने रोहित शर्माला चकवले. त्याने केवळ ८ धावा केल्या. दिनेश कार्तिकने ४ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अंबाती रायुडूही ब्राव्होच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देऊन बाद झाला. ६ बाद ८३ या स्थितीतून पोलार्डने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. चौकार, षटकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सांगड घालत पोलार्डने मुंबईला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. चेन्नईतर्फे ड्वेन ब्राव्होने ४४ धावांत २ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स- २० षटकांत ६ बाद १४८ (किरॉन पोलार्ड नाबाद ५७, दिनेश कार्तिक ३७; ड्वेन ब्राव्हो २/४४) विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- २० षटकांत ९ बाद १३९ (महेंद्रसिंग धोनी ५१; मुनाफ पटेल ३/२९)
सामनावीर : किरॉन पोलार्ड.
रॉस टेलर, पुणे वॉरियर्सचा फलंदाज
हंगामाची सुरुवात अपेक्षित झालेली नाही. पण किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात आम्हाला विजयपथावर परतण्याची संधी आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी पुणे वॉरियर्सचे सर्वच खेळाडू उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा