Priyansh Arya Fastest Century in IPL 2025 PBKS vs GT: पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. प्रियांश आर्याने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ३९ चेंडूत आपलं पहिलं आयपीएलमधील शतक पूर्ण केले. अश्विन, पथिराना अशा उत्कृष्ट गोलंदाजांची धुलाई करत त्याने आपली शतकी खेळी पूर्ण केली. प्रियांश आर्याने बाद होण्यापूर्वी ४२ चेंडूत ७ चौकार आणि ९ चौकारांसह २४५ च्या स्ट्राईक रेटने १०३ धावांची खेळी केली.
आयपीएलमध्ये आपला पहिला हंगाम खेळत असलेल्या २४ वर्षीय प्रियांशने मुल्लानपूरच्या मैदानावर स्फोटक फलंदाजी करत आपले पहिले शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये आपला फक्त चौथा सामना खेळत असलेल्या प्रियांशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध डावाची सुरुवात केली आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार मारला.
प्रियांश आर्याने मथीशा पथिरानाच्या १३व्या षटकात सलग ३ षटकार आणि एक चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे या हंगामातील सर्वात जलद शतक आहे, तर शतक करणारा तो फक्त दुसरा फलंदाज आहे. याशिवाय प्रियांश आर्याने आयपीएल इतिहासातील भारतीय फलंदाज म्हणून दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल पदार्पणात झटपट ४७ धावा करणाऱ्या प्रियांशला मागील सामन्यात निराशेसह परतावे लागले. पहिल्याच चेंडूवर त्याला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले होते. त्या निराशेवर मात करत, प्रियांशने पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि अखेरीस शतक झळकावून थांबला. पण खलीलच्या षटकात षटकारानंतर पुढच्याच चेंडूवर खलीलने त्याचा झेल सोडला होता. पण षटकाच्या पाचव्या चेंडूवर या फलंदाजाने पुन्हा षटकार मारला आणि षटकार-चौकारांच्या आतिषबाजीमध्ये सीएसकेच्या गोलंदाजांची धुलाई केली.
प्रियांश आर्यच्या शतकाच्या जोरावर आणि शशांक सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने ६ बाद २१९ धावा केल्या आहेत. यासह चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी २२० धावांचे लक्ष्य दिले आहे.