IPL 2025 PBKS vs CSK Priyansh Arya Century: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचा युवा फलंदाज प्रियांश आर्यने सर्वात जलद शतक झळकावले आहे. चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत आयपीएलच्या इतिहासातील तिसरे सर्वात जलद शतक झळकावले. यानंतर दिल्लीचा असलेल्या प्रियांशच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे आणि त्याचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी आता एक धक्कादायक खुलासा केला आहे.

चेन्नईविरुद्ध पंजाब किंग्जने ८३ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. पण प्रियांश आर्यने एका टोकाकडून आपली स्फोटक फलंदाजी सुरू ठेवली आणि ४२ चेंडूत सात चौकार आणि नऊ षटकारांसह १०३ धावा केल्या. ज्यामुळे पंजाबने २१९ धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि चेन्नईचा १८ धावांनी पराभव केला. दरम्यान प्रियांशची फलंदाजी पाहून त्याचे दिल्लीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रियांशचे प्रशिक्षक संजय भारद्वाज म्हणाले, “तो शतकी खेळीनंतर काल रात्री सुमारे ३ वाजता झोपला आणि सकाळी ७.३० वाजता उठला आणि सर्वात आधी मला फोन केला. मग मी विचारलं की त्याला कालची खेळी पाहून कसं वाटलं. तो म्हणाला की, मी काहीचं केलेलं नाही, ती सर्व देवाची कृपा होती. देवच सर्वकाही करत आहे. प्रियांश असाच अगदी साधा आहे आणि नेहमीच तसाच राहतो.”

त्याचे कोच भारद्वाज पुढे म्हणाले, प्रियांशने सांगितलं की, “श्रेयस अय्यर आणि रिकी पॉन्टिंग त्याला खूप पाठिंबा देत आहेत आणि त्यांनी मला माझ्या मनानुसार फलंदाजी करण्यास सांगितले आहे. त्या दोघांनी त्याला असंही सांगितलं की त्याला कोचिंगची गरज नाहीये.”

शतक झळकावल्यानंतर प्रियांश आर्यने एक मोठा खुलासा केला आणि म्हणाला, “मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, पण आतून मला खूप चांगलं वाटतंय. गेल्या सामन्यानंतर श्रेयस अय्यरने मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले, त्याने मला माझ्या मनाप्रमाणे खेळण्याचा सल्ला दिला.” प्रियांश आर्यच्या शतकाच्या जोरावर आणि शशांक सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्सने ६ बाद २१९ धावा केल्या आहेत. यासह चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी २२० धावांचे लक्ष्य दिले होते.