IPL 2025 Priyansh Arya on Captain Shreyas Iyer: पंजाबच्या प्रियांश आर्यने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार शतक झळकावून इतिहास घडवल आहे. या कामगिरीसह, २४ वर्षीय प्रियांश आर्य आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात जलद शतक करणारा अनकॅप्ड भारतीय आणि सीएसकेविरुद्ध सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. प्रियांश आर्यने शतकी खेळीनंतर श्रेयस अय्यरबद्दल काय सांगितलं पाहूया.

प्रियांश आर्यने आधी १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर त्याने ३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. चेन्नईविरूद्ध आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू आहे. शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत, आर्य आता आयपीएलच्या इतिहासात चौथा सर्वात जलद शतक करणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या शतकाव्यतिरिक्त, डावखुऱ्या फलंदाजाने फक्त १९ चेंडूंमध्ये त्याचे अर्धशतक पूर्ण केले. आता त्याच्याकडे त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात भारतीय खेळाडूकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.

प्रियांश आर्यने गुजरात टायटन्सविरूद्ध पहिल्या सामन्यातही वादळी फलंदाजी करत ४७ धावांची खेळी करत बाद झाला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थानविरूद्ध तो पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला होता. जोफ्रा आर्चरने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याला माघारी पाठवलं होतं. यानंतर श्रेयस अय्यरने त्याच्याशी चर्चा केली होती.

शतक झळकावल्यानंतर प्रियांश आर्यने एक मोठा खुलासा केला आणि म्हणाला, “मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, पण आतून मला खूप चांगलं वाटतंय. गेल्या सामन्यानंतर श्रेयस अय्यरने मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले, त्याने मला माझ्या मनाप्रमाणे खेळण्याचा सल्ला दिला.”

पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याबाबत तो म्हणाला, “मी विचार करत होतो की जर माझ्या स्लॉटमध्ये पहिला चेंडू आला तर मी नक्कीच षटकार मारेन. मी जितकं शक्य आहे तितकं खेळताना दबावात न राहता स्वत:ला व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो.” प्रियांशला असंही विचारण्यात आले की इंडियन प्रीमियर लीग सोपी आहे की दिल्ली प्रीमियर लीग? यावर त्याने डीपीएलचे नाव घेतले. प्रियांश पुढे खेळपट्टीबद्दल सांगताना म्हणाला की, “चेंडू बॅटवर चांगला येत होत, चेंडू जास्त टर्न होत नाहीये, त्यामुळे आम्हाला पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि विकेट घ्याव्या लागतील.”