हातातोंडाशी आलेली विजयाची संधी पुण्याच्या फलंदाजांनी घालविली, त्यामुळे पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या पुणे वॉरियर्सपेक्षा किंग्ज इलेव्हन पंजाबचे पारडे जड मानले जात आहे. रविवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या या सामन्याद्वारे पुण्यात आयपीएल क्रिकेटची धूम सुरु होत आहे.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. पंजाबचा हा पहिलाच सामना असल्यामुळे यंदा विजयी सुरुवात करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील अशी अपेक्षा आहे. पुण्याचा हा दुसरा सामना आहे. शुक्रवारी त्यांनी हैदराबाद येथे सनराईज संघाविरुद्ध विजयाची संधी गमावली होती. विजयासाठी केवळ १२७ धावांचे आव्हानही त्यांना पेलविले नव्हते.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्युजच्या नेतृत्वाखाली उतरणारा पुण्याचा संघ पहिल्या सामन्यातील चुका सुधारुन घरच्या मैदानावर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. त्याकरिता त्यांच्या रॉबिन उथप्पा, रॉस टेलर, युवराजसिंग, मनीष पांडे, मर्लान सॅम्युअल्स या अनुभवी फलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात पुण्याच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत संघास विजयाची संधी निर्माण करुन दिली होती, मात्र फलंदाजांनी त्यांच्या या कामगिरीवर पाणी सोडले होते. हैदराबाद येथील सामना आटोपून शनिवारी दुपारी येथे संघ दाखल झाल्यामुळे त्यांना सराव करण्यासाठी फारसा अवधीच मिळालेला नाही. सामन्यापूर्वी सकाळी ते सराव करण्याची शक्यता आहे.
या तुलनेत पंजाब संघास पुरेशी विश्रांती व सराव या दोन्ही गोष्टी साधता आल्या आहेत. त्यांचे खेळाडू शुक्रवारी येथे दाखल झाले असून शनिवारी येथे त्यांनी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेल लेहमन यांच्या मार्गदर्शनाखाली सरावही केला. ऑस्ट्रेलियाचा प्रौढ आक्रमक खेळाडू व यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाच्या फलंदाजाची मदार प्रामुख्याने अजहर मेहमूद, डेव्हिड हसी, ल्युक पॉवरबाश, पॉल वल्थाटी यांच्यावर आहे. गोलंदाजीत पीयुष चावला, मनप्रित गोनी, प्रवीणकुमार, परविंदर अवाना यांच्याकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. खेळपट्टी फलंदाज व गोलंदाज या दोघांनाही साथ देईल असा अंदाज आहे. सायंकाळच्या सत्रात दवाचा फायदा द्रुतगती गोलंदाजांना मिळण्याची शक्यता आहे.
क्रिकेटमध्ये राजकारण आणणे चुकीचे : अँजेलो
पुणे : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आम्ही श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करीत नसून आम्ही येथे एका फ्रँचाईजीकडून खेळत आहोत, त्यामुळेच क्रिकेटमध्ये वांशिक राजकारण आणणे चुकीचे आहे, असे पुणे वॉरियर्सचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने येथे सांगितले.
किंग्ज इलेव्हनविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यानिमित्त मॅथ्यूजने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, आम्ही सर्व श्रीलंकेचे खेळाडू भारतामधील विविध फ्रँचाईजीचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे सर्व खेळाडूंना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे.
पहिल्या सामन्यात आम्ही खूप खराब फलंदाजी केली, त्यामुळेच आम्हास हा सामना गमवावा लागला. उद्या अशा चुका घडणार नाहीत. आमच्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. उद्याचा सामना जिंकून घरच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू असेही अँजेलो म्हणाला.
विजयासाठी उत्सुक – लेहमन
आमचा हा पहिलाच सामना असल्यामुळे विजयी प्रारंभ करण्यासाठी आम्ही उत्सुक झालो आहोत. संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. त्याचा फायदा आम्हास होईल. आमच्या खेळाडूंवर कोणतेही दडपण नाही. पुण्याने पहिलाच सामना गमावला असल्यामुळे त्यांच्यावरच दडपण आहे असे किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक डॅरेल लेहमन यांनी सांगितले.
संघ-पुणे वॉरियर्स- अँजेलो मॅथ्युज (कर्णधार), उदित बिर्ला, एकलव्य द्विवेदी, अशोक दिंडा, एरॉन फिंच, रैफी गोमेझ, हरप्रितसिंग, धीरज जाधव, भुवनेश्वरकुमार, अनुस्तुप मजुमदार, मिथुन मिन्हास, मिचेल मार्श, अजंथा मेंडीस, अली मुर्तूझा, अभिषेक नायर, ईश्वर पांडे, मनीष पांडे, वेन पार्नेल, परवेझ रसूल,मर्लान सॅम्युअल्स, राहुल शर्मा, स्टीव्हन स्मिथ, तिरुमलसेटी सुमन, तमिम इक्बाल, रॉस टेलर, कृष्णकांत उपाध्याय, रॉबिन उथप्पा, श्रीकांत वाघ, ल्युक राईट, युवराजसिंग.
किंग्ज इलेव्हन पंजाब-अॅडम गिलख्रिस्ट (कर्णधार), परविंदर अवाना, पीयुष चावला, अजहर मेहमूद, अंकित चौधरी, भार्गव भट्ट, मनप्रित गोनी, विपुल शर्मा, गुरकिरतसिंग मान, सिद्धार्थ चिटणीस, हरमितसिंग, रियान हॅरिस, डेव्हिड हसी, प्रवीणकुमार, मनदीपसिंग, दिमित्री मस्कॅरिन्हास, डेव्हिड मिलर, ल्युक पॉवरबाश, नितीन सैनी, संदीप शर्मा, राजगोपाळ सतीश, सनी सिंग, पॉल वल्थाटी, मानन व्होरा.
सामन्याची वेळ- दुपारी ४ वाजल्यापासून.
यजमान पुण्यापेक्षा ‘किंग्ज’चे पारडे जड
हातातोंडाशी आलेली विजयाची संधी पुण्याच्या फलंदाजांनी घालविली, त्यामुळे पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या पुणे वॉरियर्सपेक्षा किंग्ज इलेव्हन पंजाबचे पारडे जड मानले जात आहे. रविवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या या सामन्याद्वारे पुण्यात आयपीएल क्रिकेटची धूम सुरु होत आहे.
First published on: 07-04-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune look for a better batting show against kings xi