पहिल्या दोन सामन्यांमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा पुणे वॉरियर्सचा संघ आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाची गुढी उभारण्यासाठी अष्टपैलू युवराज सिंग याच्यासह सज्ज झाला आहे. गुरुवारी होणाऱ्या या सामन्यात त्यांना तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विलक्षण चुरस पाहायला मिळणार आहे. ‘दुय्यम संघ’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राजस्थानने पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला, तर दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईटरायडर्सला पराभूत केले आहे. याउलट पुणे संघाला हैदराबाद येथे सनरायजर्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यापाठोपाठ त्यांना घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबने सहज हरविले होते. दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला पुणे वॉरियर्सचा ‘हुकमी एक्का’ युवराज हा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यामुळे त्यांच्या संघाचे मनोबल उंचावले आहे. मात्र मार्लन सॅम्युएल्स हा स्नायूच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
दुसऱ्या सामन्यानंतर पुण्याला चार दिवस विश्रांती मिळाली आहे. त्याचा फायदा त्यांना फलंदाजीतील चुका सुधारण्यासाठी झाला आहे. गेले चार दिवस त्यांनी यादृष्टीने संघाचे मार्गदर्शक अ‍ॅलन डोनाल्ड व सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर राजस्थानविरुद्ध अपयशी ऑस्ट्रेलियन फलंदाज मिचेल मार्श याच्याऐवजी स्टीव्ह स्मिथ या धडाकेबाज फलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. रॉबिन उथप्पा व मनीष पांडे यांना अपेक्षेइतकी अव्वल कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाचा क्रम बदलण्याची शक्यता असून, त्यामुळे अभिषेक नायर याला सलामीला पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
पहिले दोन सामने जिंकल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. फलंदाजीत कर्णधार राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी यांनी चांगले यश मिळविले आहे, तर गोलंदाजीत एस. श्रीशांत, सिद्धार्थ त्रिवेदी, शॉन टेट यांच्यावर त्यांची मदार आहे.
रॉयल्सच्या खेळाडूंनी दुपारच्या सत्रात सराव केला. सरावानंतर द्रविड म्हणाला, ‘‘या सामन्यातही विजय मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याबरोबरच षटकांच्या वेगाबाबतच्या नियमावलीचे उल्लंघन केले जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा