पावसामुळे बाधित लढतीत पंजाब किंग्ज संघाने अग्रेसर असल्याचं सिद्ध करत बंगळुरूवर ५ विकेट्सनी विजय मिळवला. पावसामुळे हा सामना १४ षटकांचा खेळवण्यात आला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. आततायी आक्रमण करणारे आरसीबीचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांसमोर निरुत्तर ठरले. ६३/९ अशा स्थितीतून टीम डेव्हिडने बंगळुरूला सावरलं. डेव्हिडने ५० धावांची खेळी केली आणि बंगळुरूने ९५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबनेही नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. नेहल वढेराने
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी २२ धावांची सलामी दिली. भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरनचं आक्रमण थोपवलं. पाठोपाठ प्रियांश आर्यला जोश हेझलवूडने तंबूत परतावलं. श्रेयस अय्यर आणि जोश इंगलिस यांनी पडझड रोखत डाव सावरला. खेळपट्टीवर स्थिरावलाय असं वाटत असतानाच जोश हेझलवूडचा चेंडू स्लाईस करण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यर बाद झाला. त्याने ७ धावा केल्या. दोन चेंडूंनंतर जोश इंगलिसही हेझलवूडचीच शिकार ठरला. यानंतर नेहल वढेराने सामन्याची सूत्रं हाती घेतली. फिरकीपटू सुयश शर्माच्या गोलंदाजीवर चौकार, षटकार वसूल करत त्याने धावगतीचं दडपण कमी केलं. मोक्याच्या क्षणी शशांक सिंगला भुवनेश्वर कुमारने बाद केलं.
कमी षटकांच्या सामन्यात कशी बॅटिंग करू नये याचा नमुना सादर करत आरसीबीने पंजाबच्या गोलंदाजांपुढे लोटांगण घातलं. डावखुऱ्या अर्शदीप सिंगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोश इंगलिसच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. सॉल्टचा कित्ता गिरवत कोहलीनेही अर्शदीपच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. पण ते अपयशी ठरलं. या दोघांप्रमाणेच लायम लिव्हिंगस्टोनने झेव्हियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं. पण तोही अपयशी ठरला. फिरकीपटू युझवेंद्र चहलने जितेश शर्माला माघारी धाडलं. कृणाल पंड्या मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर झेल देऊन तंबूत परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रजत पाटीदारलाही चहलनेच फसवलं. त्याने २३ धावांची खेळी केली. लिव्हिंगस्टोनच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला मनोज भडागेही एक धाव करून तंबूत परतला. भुवनेश्वर कुमारने ८ धावा करत प्रतिकार केला पण हरप्रीत ब्रारला मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न बार्टलेटच्या हातात गेला. पुढच्याच चेंडूवर ब्रारने यश दयाळला पायचीत केलं. ६३/९ अशा स्थितीतून टीम डेव्हिडने आरसीबीला बाहेर काढलं. डेव्हिडने पंजाबच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत चौकार, षटकार वसूल केले. त्याने हेझलवूडला स्ट्राईकही दिला नाही. डेव्हिडने २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५० धावांची खेळी केली. डेव्हिडच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने ९५ धावांची मजल मारली. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.