प्रभसिमरन सिंग आणि नेहल वढेरा यांच्या खणखणीत खेळींच्या बळावर पंजाबने लखनौचा अक्षरक्ष: धुव्वा उडवला. लखनौनं दिलेलं १७२ धावांचं आव्हान लखनौनं १६.१ षटकातच पार केलं आणि ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगने धोकादायक मिचेल मार्शला पहिल्याच षटकात तंबूत परतावलं. एडन मारक्रम आणि निकोलस पूरन यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. लॉकी फर्ग्युसनने मारक्रमला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. ऋषभ पंत आत्मघातकी फटका खेळून बाद झाला. त्याने २ धावा केल्या. डेव्हिड मिलरही १९ धावाच करू शकला. आयुष बदोनी आणि अब्दुल समद या युवा जोडीने लखनौला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. आयुषने ४४ तर अब्दुलने २७ धावांची खेळी केली. पंजाबतर्फे अर्शदीप सिंगने ३ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी आक्रमक सुरुवात केली. दिग्वेश राठीने प्रियांशला बाद केलं. यानंतर प्रभसिमरनने चौकार, षटकारांची लयलूट केली. ३४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ६९ धावांची खेळी करून प्रभसिमरन बाद झाला. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ६७ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयसने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी केली. नेहलने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४३ धावांची खेळी केली.