Punjab Kings Comeback After Defeat vs SRH To Biggest Win vs KKR: १२ एप्रिल २०२५ रोजी पंजाब किंग्ज संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हैदराबाद इथे झालेल्या लढतीत पंजाबने २४५ धावांचा डोंगर उभारला. मात्र अवघ्या दीड तासात हैदराबादने पंजाबच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत अशक्यप्राय विजय मिळवला. हैदराबादने ९ चेंडू आणि ८ विकेट्स राखून अविश्वसनीय विजय मिळवला. एवढ्या धावा करूनही पराभव पदरी पडल्यामुळे पंजाबवर जोरदार टीका झाली.
अर्शदीप सिंगने ४ षटकात ३७ धावा दिल्या तर चहलच्या ४ षटकात हैदराबादने ५६ धावा लुटल्या होत्या. मार्को यान्सनच्या २ षटकातच ३९ धावांची लूट झाली. यश ठाकूर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाही ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या बॅटचा तडाखा बसला होता. शशांक सिंगच्या २ षटकात हैदराबादच्या जोडगोळीने २७ धावा चोपून काढल्या. पंजाबच्या एकाही गोलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तीन दिवसात घरी परतल्यावर पंजाबच्या गोलंदाजांनी आदर्श गोलंदाजीचा वस्तुपाठच सादर केला.
१५ एप्रिल २०१५. मुल्लापूर अर्थात मिनी चंदीगढ इथे झालेल्या लढतीत पंजाबचा घरच्या मैदानावर १११ धावात खुर्दा उडाला. घरच्या मैदानावर अशी शोभा झालेल्या पंजाबने हार मानली नाही. शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजी करत पंजाबने आयपीएल स्पर्धेतल्या सगळ्यात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. चहलने ४ षटकात २८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सनने अवघ्या १७ धावात कोलकाताच्या तिघांना माघारी धाडलं. धोकादायक आंद्रे रसेलला त्रिफळाचीत करत यान्सनने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अर्शदीपने टिच्चून मारा करताना ३ षटकात अवघ्या ११ धावा देत एक विकेट मिळवली. ग्लेन मॅक्सवेलने वेंकटेश अय्यरला बाद करत कोलकाताच्या डावाला खिंडार पाडलं. एकहाती सामना फिरवणाऱ्या क्विंटन डी कॉकला तंबूत परतावत झेव्हियर बार्टलेटने पंजाबला उत्तम सुरुवात करून दिली.
१७ हंगाम खेळूनही पंजाबला आयपीएल स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही. यंदा मात्र रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वात पंजाबने कात टाकायला घेतली आहे. लिलावात २६.७५ कोटी रुपये खर्चून त्यांनी श्रेयस अय्यरला ताफ्यात घेतलं आणि कर्णधार केलं. कोलकाताला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधाराला त्यांनी आपलंसं केलं. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल या गोलंदाजांसाठी त्यांनी ३६ कोटी रुपये मोजले. या दोघांनीही मंगळवारी आपली उपयोगिता सिद्ध केली.
हैदराबादविरुद्ध ४ चेंडूत ४ षटकार लगावणाऱ्या मार्कस स्टॉइनसला पंजाबने विश्रांती दिली. हैदराबादविरुद्ध पंजाबचा प्रमुख गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापचग्रस्त झाला. लॉकी उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. यामुळे पंजाबने झेव्हियर बार्टलेटला संधी दिली. बार्टलेटने पहिल्याच लढतीत आपल्या नैपुण्याची चुणूक दाखवली. प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी पंजाबचे डावपेच सांगितले. अर्शदीप सिंग आणि मार्को यान्सन नवा चेंडू हाताळतात पण खेळपट्टीचा नूर लक्षात घेऊन आम्ही झेव्हियर आणि यान्सनकडे नवा चेंडू दिला. अर्शदीपला नंतरच्या षटकांसाठी राखून ठेवलं.
पंजाबला प्रियांश आर्यच्या रुपात युवा तडफदार सलामीवीर मिळाला आहे. श्रेयस अय्यर सातत्याने धावा करतोच आहे. नेहल वढेराने आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध केली. फलंदाजीत अपयशी ठरत असला तरी ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजीत संघाच्या विजयात योगदान देतो आहे. शशांक सिंगने फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
इतकी वर्ष सातत्याने जेतेपदापासून दूर राहिल्यानंतर संघाला प्रेरित करणं कठीण आहे पण श्रेयस-पॉन्टिंग जोडी पंजाबसाठी किमयागार ठरू शकते असं भाकीत अनेक माजी खेळाडूंनी वर्तवलं होतं. मंगळवारचा विजय हा त्याचं द्योतक म्हणावं लागेल. १११ धावा केल्यानंतर एखाद्या संघाने विजयाची शक्यता सोडून दिली असती. पंजाबने अविरत चांगला खेळ केला आणि झुंजार विजय मिळवला.