Mumbai Indians vs Punjab Kings Score Update : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाब किंग्जने कर्णधार सॅम करनच्या अर्धशतक आणि हरप्रीत भाटियाच्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर दोनशेचा टप्पा पार केला. २० षटकांत पंजाबने ८ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, त्यानंतर या धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनच्या वादळी अर्धशतक ठोकलं. पंरतु, अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा निसटता पराभव झाला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने सलग चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने तिलक वर्मा आणि नेहल वढेराची दांडी गुल केली आणि मुंबईवर विजय मिळवला.
मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्माने २७ चेंडूत ४४ धावा केल्या. कॅमरून ग्रीनने ४३ चेंडूत ६७ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. तसंच सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली. टीम डेविड १३ चेंडूत २५ धावांवर नाबाद राहिला. पंजाबसाठी अर्शदीप सिंगने चार षटकांत २९ धावा देत चार विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली.
पीयुष चावला आणि अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्यामुळं पंजाबचे चार फलंदाज माघारी परतले होते. पण त्यानंतर कर्णधार सॅम करनने आक्रमक फलंदाजी करून पंजाबच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. सॅमने २९ चेंडूत ५५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. तसंच हरप्रीत भाटियानेही २८ चेंडूत ४१ धावांची खेळी साकारली. तर जितेश शर्माने षटकारांचा पाऊस पाडत ७ चेंडूत २५ धावा कुटल्या. त्यामुळे पंजाब किंग्जने २० षटकांत ८ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मुंबईने २० षटकांत ६ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या.