IPL 2025 R Ashwin Youtube Channel Controversy: रविचंद्रन अश्विन यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (CSK) कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली नाही. या संघाने ४ सामने खेळले असून तीन सामन्यांमध्ये पत्करावं लागलं आहे. चेन्नईचा संघ २ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. संघाच्या खराब कामगिरीदरम्यान, संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन वादात सापडला आहे. अश्विन त्याच्या युट्युब चॅनेलमुळे चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावरील वादानंतर आता अश्विनने मोठा निर्णय घेतला आहे.
रविचंद्रन अश्विनने स्पष्ट केलं आहे की त्याच्या यूट्यूब चॅनलवर यापुढे कोणतेही CSK चे कव्हर करणार नाहीत. आत्तापर्यंत आयपीएल २०२५ मध्ये, अश्विन चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांचे प्रीव्यू आणि पोस्ट मॅच शो करत होता. मात्र आता त्याच्या चॅनेलवर सीएसके सामन्यांचे व्हीडिओ दिसणार नाहीत.
आर अश्विनने युट्युब चॅनेलबाबत मोठा निर्णय का घेतला?
सीएसके सामन्याशी संबंधित यूट्यूब शोमध्ये पाहुणे म्हणून आलेले दक्षिण आफ्रिका आणि आरसीबी विश्लेषक प्रसन्ना अगोराम यांनी संघ निवडीशी संबंधित फ्रँचायझीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. अश्विन आणि जडेजापेक्षा नूर अहमदला खेळवण्याच्या निर्णयावर त्याने आक्षेप घेतला होता. मात्र, नंतर तो व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला. मात्र तोपर्यंत त्यावरून वाद निर्माण झाला होता.
प्रसन्ना अगोराम या शोमध्ये नियमित पाहुणे म्हणून उपस्थित असतात. या वादग्रस्त ठरलेल्या व्हीडिओमध्ये अफगाणिस्तानच्या नूर अहमदची निवड करण्याच्या CSK च्या निर्णयावर त्याने टीका केली होती. प्रसन्ना अगोराम म्हणाले की, जर संघाने रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या उपस्थितीे फिरकी आक्रमण मजबूत करण्याचे नियोजन केले होते, तर संघाला दुसरा फिरकी गोलंदाज घेण्याची काय गरज होती आणि त्यांचे हेच विधान वादग्रस्त ठरले.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या २५ धावांच्या पराभवानंतर सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे प्रकरण व्यर्थ असल्याचे सांगितले. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे फ्लेमिंग म्हणाले होते. अश्विनचे यूट्यूब चॅनल आहे हेही त्यांना माहित नाही. ६ एप्रिलला अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर एक प्रशासक नोट पोस्ट करण्यात आली होती, ज्यावर असे लिहिले होते की त्याचं युट्युब चॅनेल यापुढे CSK चे सामने कव्हर करणार नाही.