विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये गुरुवारी सामन्यावेळी झालेल्या बाचाबाचीची तुलना माध्यमांनी हरभजनसिंगने श्रीशांतला लगावलेल्या थप्पडशी केल्यामुळे तो काहीसा नाराज झालाय. श्रीशांतने त्या दिवशी जे काही घडलं, त्याची सविस्तर माहिती आपल्या ट्विटर पेजवर दिलीये.
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात मुंबई इंडियन्सचा तत्कालिन कर्णधार हरभजनसिंगने राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया श्रीशांतला थप्पड मारल्याची चर्चा क्रीडाविश्वात रंगली होती. मात्र, हरभजनने आपल्याला थप्पड मारलीच नव्हती, असे श्रीशांतने आपल्या ट्विटर पेजवर लिहिलंय. त्यावेळी हरभजनचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला होता, अशीही टिप्पणी श्रीशांतने केलीये.
तो म्हणतो, हरभजनने मला थप्पड मारलीच नव्हती. मी नेहमीप्रमाणेच त्यादिवशी खेळलो. मात्र, त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. मुंबईचा कर्णधार असल्यानेही त्याला आपल्या पराभव बोचला होता. मला थप्पड मारल्याबद्दल अजूनही लोकं हरभजनला दोष देत असल्याचे पाहून वाईट वाटतं. लोकांनी त्यादिवशी नेमकं काय घडले, हे समजण्यासाठी ‘ती’ व्हिडिओ क्लिप पाहावी. आयपीएलकडे ती क्लिप उपलब्ध आहे. एवढंच मी आता सांगू शकेन.
हरभजनची ती प्रतिक्रिया पूर्वनियोजित होती, असेही श्रीशांत याने लिहिले आहे.

Story img Loader