IPL 2025 Rahul Dravid Reaction Vaibhav Suryavanshi Century Video: वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सला अनोखा विजय मिळवून दिला आहे. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने अनोखी फलंदाजी करत सर्व गोलंदाजांची धुलाई करत ३५ चेंडूत शतक झळकावलं. वैभवची स्फोटक फलंदाजी पाहून राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आनंदाने उत्साहित झाले. एवढंच नाही तर या धाडसी खेळीनंतर राहुल यांनी अक्षरश: स्वत:ची दुखापत विसरून उडीच मारली. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

वैभव सूर्यवंशीने क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सोनेरी अक्षरात उमटवले आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. वैभव सूर्यवंशीने २६५.७८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यामध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. त्याने फक्त ३५ चेंडूत हे शतक पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने हे शतक झळकावले होते. आता १५ वर्षांनंतर, वैभव सूर्यवंशीने त्याला मागे टाकले आहे.

वैभवची स्फोटक फलंदाजी पाहून राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूप आनंदी झाले होते. एवढेच नाही तर या धाडसी खेळीनंतर राहुलने जागेवरून उडी मारली. आयपीएलपूर्वी राहुल द्रविड यांच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे ते व्हीलचेअरवर दिसले आहेत. तर सामन्यादरम्यान ते खुर्चीवर बसतात. वैभव सूर्यवंशीच्या शतकाचं सर्वाधिक सेलिब्रेशन राहुल द्रविड यांनी केलं.

वैभव सूर्यवंशी ९४ धावांवर असताना त्याने षटकार लगावत दणक्यात आपलं शतक पूर्ण केलं. वैभवने शतक पूर्ण करताच राहुल द्रविड उत्साहात आणि आनंदात आपल्या जागेवरून ताडकन् उठले. पण यादरम्यान त्यांनी अचानक दोन्ही पायांवर जोर दिल्याने ते पडणार होतेच पण त्यांनी लगेच पकडून स्वत:ला सावरलं आणि दोन्ही हात वर करत वैभवला जोरात टाळ्या वाजवत शुभेच्छा दिल्या.

राहुल द्रविड यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वत:च्या शतकाचं इतकं सेलिब्रेशन किंवा आनंद साजरा केला नसेल, जितका त्यांनी वैभवच्या शतकाचा केला, असं त्यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले हरभजन सिंग, आरपी सिंह यांनी कॉमेंट्री करताना सांगितलं.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २०९ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने १५.५ षटकांत लक्ष्य पूर्ण केले. वैभव व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वालने ७० धावांची नाबाद खेळी केली आणि कर्णधार रियान पराग ३२ धावांवर नाबाद परतला. आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी राजस्थानला हा विजय खूप महत्त्वाचा होता.