शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला. पंजाबने राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली.

पाहा व्हिडीओ-

तेवातियाने एकाच षटकात पाच षटकार लगावल्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंगने एक मजेशीर ट्विट केलं. “मिस्टर राहुल तेवातिया…. असं करू नका… ओव्हरमधल्या त्या एका चेंडूवर षटकार न मारल्याबद्दल धन्यवाद! सामना अत्यंत अप्रतिम झाला. राजस्थान… तुमचं मनापासून अभिनंदन. मयंक अग्रवाल आणि संजू सॅमसन… तुमच्या खेळी अप्रतिम होत्या”, असे ट्विट त्याने केले.

३१ चेंडूत ७ षटकार खेचत तेवतियाने ५३ धावा केल्या. अखेरच्या षटकांत शमीने तेवतियाला तर मुरगन आश्विनने रियान परागला माघारी धाडत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू टॉम करनने चौकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul tewatia 5 sixes in an over video yuvraj singh reaction cheeky tweet vjb