पुणे वॉरियर्सकडून पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन केल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला असून घरच्या मैदानावर विजयपथावर परतण्यासाठी ते उत्सुक आहेत.
सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात राजस्थानला ‘थप्पड’ प्रकरण विसरून खेळावे लागणार आहे. एस. श्रीशांतने २००८मध्ये हरभजन सिंगसोबत घडलेले ‘थप्पड’ प्रकरण उकरून काढले होते. एका तासात त्याने ट्विटरवर ४४ वेळा याबाबत भाष्य केले होते. या प्रकरणामुळे श्रीशांतचे संघातील स्थान डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर राजस्थानला शेन वॉटसन, शॉन टेट आणि राहुल शुक्ला या खेळाडूंच्या तंदुरुस्तीची समस्या सोडवावी लागणार आहे.
राजस्थानने सलग दोन विजय मिळवून या मोसमाची शानदार सुरुवात केली. पण पुण्याविरुद्ध त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याने ११ सामन्यांनंतर पहिल्या विजयाची नोंद केली. आता राजस्थान संघ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे ते चाहत्यांना पुन्हा एकदा विजयाची भेट देतील, अशी अपेक्षा आहे. अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड हे राजस्थानचे आघाडीचे फलंदाज फॉर्मात असून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. भारताचा सर्वात अनुभवी फलंदाज राहुल द्रविडने आतापर्यंत दोन अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. रहाणेसुद्धा चांगले योगदान देत आहे. वॉटसन संघात परतला असला तरी त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही.
राजस्थानला गोलंदाजतही बदल करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. पुण्याविरुद्धच्या सामन्यात श्रीशांत महागडा गोलंदाज ठरला होता. जेम्स फॉल्कनरने १७ धावांमध्ये दोन विकेट्स मिळवत आपली छाप पाडली होती. त्याचबरोबर सिद्धार्थ त्रिवेदीनेही चांगली गोलंदाजी केली होती.
किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंत एक सामना जिंकला असून त्यांना एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून १० विकेट्सनी पराभूत व्हावे लागल्यामुळे पंजाबचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे. पुण्याला पंजाबने आठ विकेट्सनी हरवले होते. राजस्थानविरुद्ध त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी ते उत्सुक आहेत. संदीप शर्मा, मनन व्होरा आणि अंकित चौधरी या युवा फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट, डेव्हिड हसी आणि मनदीप सिंग यांच्यामुळे पंजाबची फलंदाजी मजबूत आहे. प्रवीण कुमार, रायन हॅरिस, अझर मेहमूद आणि परविंदर अवाना यांच्यावर पंजाबच्या गोलंदाजीची भिस्त आहे. मात्र पंजाबला विजय मिळवण्यासाठी सांघिक कामगिरीवर भर द्यावा लागणार आहे.
विजयपथावर परतण्यासाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक
पुणे वॉरियर्सकडून पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन केल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला असून घरच्या मैदानावर विजयपथावर परतण्यासाठी ते उत्सुक आहेत.
First published on: 14-04-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajastan royals interested to return on winning way