* रॉयल्सचा हैदराबादवर ८ विकेट्सनी विजय
* जेम्स फॉल्कनरचे पाच बळी
* शेन वॉटसनची ९८ धावांची तुफानी खेळी
हैदराबाद सनरायजर्सचा अक्षरक्ष: धुव्वा उडवत राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात आम्ही शेर आहोत हे सिद्ध केले. जेम्स फॉल्कनरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादची ५ बाद १९ अशी अवस्था केली. डॅरेन सॅमीच्या एकाकी खेळीच्या जोरावर हैदराबादने १४४ धावांची मजल मारली. शेन वॉटसनच्या ५३ चेंडूत ९८ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थानने ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अडखळत झाली. ९ चेंडूत जेमतेम एक धाव करणारा अजिंक्य रहाणे स्टेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ७ बाद १ या स्थितीतून राहुल द्रविड आणि शेन वॉटसन या अनुभवी जोडीने संयमी भागीदारी करत डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडत विजयाचा पाया रचला. थिसारा परेराने द्रविडला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. द्रविड बाद झाल्यानंतर वॉटसनने आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि हैदराबादच्या गोलंदाजीची कत्तल केली. चौकार-षटकारांची बरसात करत वॉटसनने राजस्थानला एकहाती सामना जिंकून दिला. वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली, यामध्ये बिन्नीचा वाटा होता फक्त ९ धावांचा. वॉटसनने केवळ १४ चेंडूत ५३ वरून ९८ अशी झेप घेतली. वॉटसनने १३ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ चेंडूत ९८ धावा फटकावल्या.
तत्पूर्वी राजस्थानच्या भेदक गोलंदाजीपुढे सनरायजर्स हैदराबादची दयनीय अवस्था झाली. पहिल्याच षटकात अजित चंडिलाने अक्षत रेड्डीला बाद केले. पुढच्याच षटकांत जेम्स फॉल्कनरने कुमार संगकारा आणि शिखर धवन या दोघांनाही माघारी धाडले. हे दोन महत्त्वाचे फलंदाज एकाच षटकात तंबूत परतल्याने हैदराबादचा संघ अडचणीत आला. त्यातच करण शर्मालाही फॉल्कनरने बाद केले. थिसारा परेरा मोठा फटका खेळण्याच्या नादात कुपरच्या हाती झेल देऊन परतला आणि हैदराबादची ५ बाद १९ अशी अवस्था झाली. हनुमा विहारीने डॅरेन सॅमीला साथ देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ४ धावा करून विहारी कुपरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर अमित मिश्राने सॅमीला साथ देत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच हैदराबादला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. दोन षटकांत सहा धावांत ३ बळी टिपणारा फॉल्कनर गोलंदाजीसाठी परतला आणि त्याने मिश्राला बाद केले. त्याने २१ धावा केल्या. यानंतर सॅमीने आशिष रेड्डीला हाताशी घेत धावसंख्या वाढवली. सॅमीला बाद करत फॉल्कनरने डावात पाच बळी घेण्याची करामत केली. सॅमीने ८ चौकार आणि एका षटकारासह ४१ चेंडूत ६० धावांची खेळी केली. सॅमी बाद झाल्यानंतर डेल स्टेन शेवटच्या षटकांमध्ये ८ चेंडूत १८ धावा फटकावल्यामुळे हैदराबादने १४४ धावांची मजल मारली. राजस्थानतर्फे फॉल्कनरने २० धावांत ५ बळी टिपले. अजित चंडिलाने १३ धावांत २ बळी मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्षिप्त धावफलक :
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ९ बाद १४४ (डॅरेन सॅमी ६०, अमित मिश्रा २१, जेम्स फॉल्कनर ५/२०, अजित चंडिला २/१३) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १७.५ षटकांत २ बाद १४६ (शेन वॉटसन नाबाद ९८, राहुल द्रविड ३६, डेल स्टेन १/१५)
सामनावीर : जेम्स फॉल्कनर
ब्रेट ली, कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज
चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईत दाखल झालोय.. प्रचंड ट्रॅफिक जॅम आमच्या स्वागताला सज्ज आहे.. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धचा चांगला फॉर्म चेन्नईविरुद्धही दाखवू असा विश्वास आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajastan royals won by 8 wickets against hyderabad sunrisers