किंग्स इलेव्हन पंजाबवर दमदार विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने ‘बाद फेरीत प्रवेश’ हा निर्धार आणखी पक्का केला. केव्हॉन कूपरच्या ३ निर्णायक बळींच्या जोरावर राजस्थानने पंजाबला १४५ धावांतच रोखले. त्यानंतर मुंबईकर अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन आणि संजू सॅमसनच्या एकत्रित प्रयत्नांच्या जोरावर हे लक्ष्य ८ विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयासह राजस्थानने बाद फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे.
माफक लक्ष्य मिळालेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या राहुल द्रविडला बिपुल शर्माने त्रिफळाचीत केले. मात्र अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची संयमी भागीदारी केली. रहाणेने शेवटपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडण्याचा निश्चय केल्याने वॉटसनने फटकेबाजीची जबाबदारी स्वीकारली. चावलाच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्याने २५ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनने रहाणेला साथ दिली. या जोडीने ५६ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी करत राजस्थानला ८ विकेट्सनी शानदार विजय मिळवून दिला. धावगतीचे दडपण वाढत असताना सॅमसनने ३३ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४७ धावा केल्या. अजिंक्य रहाणने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ चेंडूंत नाबाद ५९ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबने १४५ धावांची मजल मारली. अजित चंडिलाने पहिल्याच चेंडूवर मनदीप सिंगला बाद करत पंजाबला धक्का दिला. मात्र यानंतर अॅडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्श या ऑस्ट्रेलियन जोडीने तुफानी फटकेबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. ही जोडगोळी राजस्थानपासून सामना हिरावून घेणार असे वाटत असतानाच केव्हॉन कूपरने गिलख्रिस्टला बाद करत ही जोडी फोडली. गिलख्रिस्टने ६ चौकारांसह ३२ चेंडूंत ४२ धावांची खेळी केली. डेव्हिड हसी फार काळ टिकला नाही. शेन वॉटसनने त्याला त्रिफळाचीत केले. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत असतानाही मार्शने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. मात्र कूपरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मार्श बाद झाला. मार्शने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६४ चेंडूंत ७७ धावांची खेळी केली. बंगळुरूविरुद्ध ३८ चेंडूंत शतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड मिलरला कूपरनेच रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याला फक्त ८ धावा करता आल्या. मार्श, गिलख्रिस्ट आणि मिलर या तिन्ही महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडत कूपरने पंजाबच्या धावसंख्येला वेसण घातली. चौदाव्या षटकात १ बाद १०२ अशा चांगल्या स्थितीत असलेल्या पंजाबला केवळ १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
राजस्थानला कूपर पावला!
किंग्स इलेव्हन पंजाबवर दमदार विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने ‘बाद फेरीत प्रवेश’ हा निर्धार आणखी पक्का केला. केव्हॉन कूपरच्या ३ निर्णायक बळींच्या जोरावर राजस्थानने पंजाबला १४५ धावांतच रोखले. त्यानंतर मुंबईकर अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन आणि संजू सॅमसनच्या एकत्रित प्रयत्नांच्या जोरावर हे लक्ष्य ८ विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयासह राजस्थानने बाद फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-05-2013 at 01:27 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan beat kings xi by 8 wkts inch closer to play offs