Rajasthan Royals vs Gujarat Titans Highlights: वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी सर्वांना दाखवून दिलं आहे की, राजस्थान रॉयल्सचा संघ अजूनही स्पर्धेत कायम आहे. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या राजस्थान रॉयल्सला सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले होते. हा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण हा सामना गमावला, तर राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार होता. त्यामुळे राजस्थानला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता.

या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने वादळी सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या षटकापासून गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वैभवने ईशांत शर्मा, प्रसिद्ध कृ्ष्णा, मोहम्मद सिराज आणि राशिद खानसारख्या अनुभवी गोलंदाजांचा चौकार आणि षटकारांनी समाचार घेतला.

या डावात फलंदाजी करताना दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावा जोडल्या. वैभवने ३८ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ११ षटकारांच्या साहाय्याने १०१ धावांची विक्रमी खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ४० चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ७० धावांची खेळी केली. त्यानंतर रियान परागने १५ चेंडूंचा सामना करत ३२ धावा चोपल्या. हा सामना राजस्थानने ८ गडी राखून आपल्या नावावर केला.

गुजरातने उभारला २०९ धावांचा डोंगर

या सामन्यात रियान परागने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. गुजरातकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि साई सुदर्शनने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून ९३ धावा जोडल्या. सलामीला फलंदाजी करताना साई सुदर्शनने ३९ धावा चोपल्या. तर शुभमन गिलने ८४ धावांची खेळी केली. शेवटी जोस बटलरने नाबाद ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद २०९ धावा केल्या.