‘दैव देते, अन् कर्म नेते..’ अशी गत सध्या मुंबई इंडियन्स संघाची झाली आहे. किरॉन पोलार्ड आणि कोरे अँडरसन यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर १६४ धावांचे आव्हान मुंबईने उभे केले. मात्र गोलंदाजांना आलेले अपयश आणि क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा यामुळे मुंबईला आयपीएलमधील मंगळवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. राजस्थानचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने जबाबदारीने खेळ करून राजस्थानला सलग तिसरा विजय मिळवून दिला, तर दुसरीकडे मुंबइच्या नावे पराभवाची हॅट्ट्रिक नोंदली गेली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईच्या फलंदाजांना राजस्थानच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर फटकेबाजी करता आलेली नाही. सलामीवीर आरोन फिंचला (१०) डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तंबूत परतावे लागले. पुढच्याच षटकात पार्थिव पटेलला (१६) धवल कुलकर्णीने चतुराईने बाद केले. कर्णधार रोहित शर्माला शुन्यावर स्टुअर्ट बिन्नीने बाद केले. उन्मुक्त चंदही (१२) प्रवीण तांबेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अँडरसन आणि पोलार्ड यांनी संघाच्या डावाला आकार दिला. पोलार्डने ३४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार लगावत ७० धावांची खेळी साकारली. अँडरसननेही ३८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा केल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या बळावर मुंबईने ५ बाद १६४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाने पहिल्या सहा षटकांत सातच्या सरासरीने धावा काढल्या. सलामीवीर संजू सॅमसनला (१७) विनय कुमारने बाद केल्यानंतर कर्णधार स्टिव्हन स्मिथ आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. १२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उन्मुक्त चंदने रहाणेचा झेल सोडला. मात्र, १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयस गोपालने अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या रहाणेला (४६) बाद केले. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने (१३) सलग दोन षटकार खेचून धावा व चेंडू यांच्यातील दरी कमी केली, परंतु त्याला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. लसिथ मलिंगाने त्याचा त्रिफळा उडविला. स्मिथ मात्र एका बाजूने नांगर रोवून होता. १७व्या षटकात मिंलंगाच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत चौकार मारून स्मिथने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण होताच स्मिथने आपले हात मोकळे करत मैदानाच्या चहूबाजूंना फटकेबाजी करून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्मिथने ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ७९ धावा केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा