Rajasthan Royals create history in IPL : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील १९ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव करत हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. त्याचबरोबर या विजयासह राजस्थान रॉयल्स संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. राजस्थान रॉयल्सने असा पराक्रम केला आहे, जो आयपीएलमध्ये यापूर्वी कोणत्याही संघाला करता आलेला नाही.
राजस्थान रॉयल्सने नोंदवला सलग चौथा विजय –
राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्सने या हंगामात आत्तापर्यंत ४ सामने खेळले असून हे सर्व सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून या हंगामाची सुरुवात केली. यानंतर त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्याचबरोबर आता त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवून सलग चौथा विजय नोंदवला.
आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ –
आयपीएलच्या इतिहासातील ही सहावी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने हंगामातील पहिल्या ४ सामन्यात सलग विजय मिळविला आहे. यापूर्वी २०१५ मध्येही राजस्थान रॉयल्सने हंगामातील पहिल्या ४ पैकी ४ सामने जिंकले होते. यासह, राजस्थान रॉयल्स हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याने हंगामाच्या सुरुवातीचे सलग ४ सामने दोनदा जिंकले आहेत. राजस्थान व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाला हा पराक्रम दोनदा करता आलेला नाही.
हेही वाचा – IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
आयपीएल हंगामातील पहिले सलग ४ सामने जिंकणारे संघ –
२००८ – चेन्नई सुपर किंग्ज<br>२००९ – डेक्कन चार्जर्स
२०१४ – पंजाब किंग्ज<br>२०१५ – राजस्थान रॉयल्स
२०२१ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२०२४ – राजस्थान रॉयल्स
हेही वाचा – RR vs RCB : बटलरने शतक झळकावून केएल राहुलच्या विक्रमाशी साधली बरोबरी, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
राजस्थानने हा सामना एकतर्फी जिंकला –
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८३ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने संघाकडून सर्वाधिक ११३ धावा केल्या. पण जोस बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने अवघ्या १९.१ षटकांत हे लक्ष्य गाठले. राजस्थानकडून जोस बटलरने ५८ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या.