Sanju Samson fined 12 lakhs : आयपीएल २०२४ मधील २४ वा सामना बुधवारी रात्री जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. ज्यामध्ये गुजरातने राजस्थानच्या विजयरथाला रोखत ३ विकेट्सनी विजय मिळवला. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पराभवाच्या दु:खात असतानाच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी अचानक एक वाईट बातमी आली आहे. त्याला गुजरातविरुद्धच्या सामन्यासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
संजू सॅमसनच्या एका चुकीमुळे त्याला १२ लाखांचे नुकसान सहन करावे लागले आहे. वास्तविक, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेटप्रकरणी दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयने ही मोठी शिक्षा सुनावली आहे. राजस्थान रॉयल्स संघ निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण करू शकला नाही. आयपीएल २०२४ च्या हंगामातील संजू सॅमसनचा हा पहिलाच गुन्हा होता.
स्लो ओव्हर रेटचा राजस्थानला फटका –
स्लो ओव्हर रेटमुळे, राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यातील शेवटच्या षटकात ४ ऐवजी ५ खेळाडूंना ३० यार्डच्या वर्तुळात ठेवावे लागले. आयपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, ‘राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हा १० एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. संजू सॅमसनचा हंगामातील स्लो ओव्हर रेटशी संबंधित हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा – हार्दिक व क्रुणाल पंड्याला सावत्र भावानंच लावला ४.३ कोटींना चुना; मुंबई पोलिसांकडून अटक
ही चूक पुन्हा झाल्यास होणार मोठा दंड –
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पुन्हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास, त्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच, संघातील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५% दंड आकारला जाईल. आयपीएल २०२४ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला दोनदा आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला स्लो ओव्हर रेटसाठी एकदा दंड ठोठावण्यात आला आहे.
नियमांनुसार, आयपीएलच्या एका हंगामात कर्णधार तीन वेळा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास, ३० लाख रुपयांच्या दंडाव्यतिरिक्त, त्याच्यावर एका आयपीएल सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल. त्याच वेळी, प्रभावित खेळाडूसह प्लेइंग इलेव्हनमधील इतर खेळाडूंना प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा मॅच फीच्या ५०% दंड आकारला जाईल.