आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीमुळे चाहता वर्ग फारच निराश आहे. राजस्थान रॉयल्सने सलग पाच सामने गमावले असून संघ ८व्या स्थानी आहे. मुख्य म्हणजे गेल्या तीन सामन्यांमध्ये राजस्थानने विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये सामने गमावले. राजस्थानची कामगिरी पाहता संघ, कोच, संघाचे मालक सर्वच निराश आहेत. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे सीईओंचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

२४ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर अखेरच्या षटकांमध्ये सामना जिंकला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात राजस्थानने चांगली झुंज दिली, पण शेवटी आरसीबीने सामना जिंकला. या सामन्यानंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये राजस्थानचे सीईओ जेक लश मॅक्रम बेंगळुरूमधील एका मद्यविक्री करणाऱ्या दुकानाकडे जाताना दिसत आहेत.

आरसीबीने दिलेल्या २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने वादळी सुरूवात केली. पण नशीबाने मात्र राजस्थानची साथ दिली नाही आणि संघाला अवघ्या ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. या राजस्थानच्या पराभवानंतर संघाच्या सीईओच्या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

रॉयल्सच्या पराभवानंतर लगेचच बेंगळुरूच्या मध्यवर्ती भागातील टॉनिक या मोठ्या दारूच्या दुकानाकडे मॅक्रम जात असतानाचा एक व्हीडिओ चाहत्याने टिपला आहे. आरसीबीचा चाहत्याने टिपलेल्या या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की मॅक्रम संघाच्या पराभवाच्या दुखामध्ये त्या दुकानाकडे जात आहे.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. आरसीबीकडून विराट कोहलीने ४२ चेंडूत ७० धावांची शानदार खेळी केली, तर देवदत्त पडिक्कलने २७ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्याशिवाय टिम डेव्हिडने १५ चेंडूत २३ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला २० षटकांत १९४ धावा करता आल्या. संघाला ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने १९ चेंडूत ४९ धावा केल्या. याशिवाय ध्रुव जुरेलने ३४ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी केली. मात्र, दोघांची खेळी व्यर्थ ठरली.

या विजयानंतर, आरसीबी आता पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या हंगामातील हा त्यांचा सहावा विजय आहे. विशेष म्हणजे या हंगामात आरसीबीने घऱच्या मैदानाबाहेर एकही सामना गमावलेला नाही. आता त्यांचा पुढचा सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होईल, जो अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल.