Rajasthan Royals have signed Keshav Maharaj : आयपीएलच्या १७व्या हंगामाला सुरुवात झाली असून सर्व संघांनी किमान एक सामना खेळला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडलेल्या प्रसिध कृष्णाच्या जागी त्यांनी एका खेळाडूला संघात स्थान दिले आहे. आत्तापर्यंत हा खेळाडू या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता, पण आता हा खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये दिसणार आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराज आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला केशव महाराज लखनऊ सुपर जायंट्स संघाचा सदस्य होता. तो एसए ट्वेन्टी लीगमध्ये सुपर जायंटसाठी देखील खेळतो, परंतु त्याला आयपीएलमधील अधिकृत संघाचा भाग बनवण्यात आले नव्हते. तो फक्त हंगामात संघासोबत प्रशिक्षण घेत होता. अशा परिस्थितीत तो खेळाडू म्हणून लखनऊ संघाचा भाग नव्हता. मात्र, आता राजस्थान रॉयल्सच्या वतीने त्याला बदली खेळाडू म्हणून आपल्या संघात सामील करु घेतले आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजांनी गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळपट्ट्यांवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. जिथे त्याने १० सामन्यांत ५ पेक्षा कमी इकॉनॉमीने १५ बळी घेतले. या वर्षाच्या सुरुवातीला एसए ट्वेन्टी लीगमध्ये केशवने सुपर जायंट्स फ्रँचायझीकडून खेळताना १३ सामन्यात १५ बळी घेतले होते. राजस्थान रॉयल्स संघाने मोसमाची चांगली सुरुवात केली असून त्यांनी पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा २० धावांनी पराभव केला.
केशव महाराजला किती पैसे मिळाले –
अलीकडेच प्रसिध कृष्णाच्या डाव्या प्रॉक्सिमल क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे सध्या तो बरा होत आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी क्रिकेटपटू केशव महाराजला संधी मिळाली आहे, राजस्थान रॉयल्सने केशव महारजला त्याच्या मूळ किंमत ५० लाख रुपये देऊन करारबद्ध केले आहे. तो गोलंदाजीसह चांगल्या प्रकारे फलंदाजी करु शकतो.