संजू
राजस्थान रॉयल्स संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. मात्र, तरीदेखील या संघाला आयपीएल २०२५ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानने आतापर्यंत या स्पर्धेत ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत, तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या सामन्यात राजस्थानने दिल्लीला जवळजवळ हरवलं होतं. मात्र, सुपर ओव्हरमध्ये राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात सुपर ओव्हर होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसून येत आहे, तर संजू सॅमसन वेगळाच उभा असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता राहुल द्रविडने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
संजू सॅमसन-राहुल द्रविड यांच्यात खरंच वाद झाला आहे का?
लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, “मला खरंच माहीत नाही, अशा बातम्या कोण पसरवतंय. संजू आणि मी एकत्र काम करतोय. तो आमच्या संघातील एक महत्त्पूर्ण भाग आहे. जे काही निर्णय घेतले जातात, त्यात त्याचा सहभाग नेहमीच असतो. पण, कधी कधी सामना गमावल्यानंतर सर्वकाही ठीक नसतं, तुम्हाला टिकेचा सामना करावा लागतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “संघातील वातावरण खूप चांगलं आहे. खेळाडू खूप मेहनत घेत आहेत, याचा मला आनंद आहे. जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत नसतात, त्यावेळी त्यांनाही त्रास होतो हे लोकांना कळत नाही.”
राजस्थान रॉयल्सने गेल्या हंगामात दमदार खेळ केला होता. मात्र, या हंगामात संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला संजू सॅमसन दुखापतग्रस्त होता, त्यामुळे त्याच्या जागी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज रियान परागकडे सोपवण्यात आली होती. त्यावेळी राजस्थानला हैदराबाद, कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर राजस्थानने पंजाब आणि चेन्नईला पराभूत करून दमदार कमबॅक केलं. सध्या राजस्थानचा संघ ४ गुणांसह आठव्या स्थानी आहे.