ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभूत केल्यानंतर याच मैदानानात राजस्थान रॉयल्सशी गाठ पडणार आहे ती सनरायझर्स हैदराबादशी. विजयाच्या वाटेवर पुन्हा परतलेला राजस्थानचा संघ गुरुवारी हैदराबादविरुद्ध खेळताना विजयानिशी बाद फेरीत पोहोचण्याचेच लक्ष्य ठेवून उतरणार आहे.
राजस्थानने या स्पर्धेत सलग पहिले पाच सामने जिंकून धडाकेबाज प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला, पण त्यानंतर दोन सामन्यांमध्ये कोणताच निर्णय झाला नाही. तथापि दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध नुकताच त्यांनी विजय मिळवीत पुन्हा बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. चौदा गुणांसह ते साखळी गटात दुसऱ्या स्थानावर आहेत.
अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन यांनी सातत्याने फलंदाजी करीत चमक दाखविली आहे. रहाणेने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करीत फलंदाजीत अव्वलस्थान पटकावले आहे. त्यांच्यावरच राजस्थानची मदार आहे. गोलंदाजीत टीम साउदी, जेम्स फॉकनर व प्रवीण तांबे यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
राजस्थानच्या तुलनेत हैदराबाद संघाला या स्पर्धेत अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करता आलेली नाही. यापूर्वी त्यांना राजस्थानकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्याची हैदराबादला संधी आहे. त्यांनी चेन्नई सुपरकिंग्जवर २२ धावांनी सनसनाटी विजय मिळविला असला, तरी दोन दिवसांपूर्वी कोलकाताने त्यांचा दणदणीत पराभव केला होता. कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य अनुभवी फलंदाजांनी सपशेल निराशा केली आहे. क्षेत्ररक्षणातील चुका ही हैदराबादसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. डेल स्टेन, भुवनेश्वर सिंग व ट्रेन्ट बोल्ट हे तीन प्रभावी वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे असले, तरी त्यांना यंदा फारसे यश मिळालेले नाही. फिरकीत बिपुल शर्मा व कर्ण शर्मा यांच्यावर त्यांची मदार आहे.
वेळ : दुपारी ४.०० वा. पासून
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा