राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर असला तरी झालेले पराभव ते नक्कीच विसरू शकणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्यावर विजय मिळवला होता, त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांच्याशी दोन हात करताना पराभवाचा बदला घेण्यासाठीच राजस्थानचा संघ सज्ज झाला असेल. यापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये बंगळुरूने राजस्थानला १३० धावांवर रोखले होते आणि या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत सामना नऊ विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात राजस्थान पराभवाचा वचपा काढतो की बंगळुरू दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवत सरस असल्याचे दाखवून देते, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये राजस्थानने पाच विजय मिळवले आहेत आणि त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे बंगळुरूच्या खात्यामध्ये सहा गुण आहेत.
अजिंक्य रहाणे हा राजस्थानच्या फलंदाजीचा कणा आहे, पण त्याला वगळता अन्य एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. शेन वॉटसन आणि स्टीव्हन स्मिथ यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दीपक हुडाने दमदार फलंदाजी करत चमक दाखवली असली तरी त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गोलंदाजीमध्ये ख्रिस मॉरिस, जेम्स फॉकनर आणि मुंबईकर प्रवीण तांबे यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे.
गेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १० विकेट्स राखून विजय मिळवल्याने बंगळुरूचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी संयमी सुरुवात केली असली तरी सध्याच्या घडीला ते चांगल्या फॉर्मात आले आहेत. एबी डी’व्हिलियर्सकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क आणि वरुण आरोन यांच्यावर संघाची मदार असेल. फिरकीपटू युझवेंद्र चहलही चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स- शेन वॉटसन (कर्णधार), अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे, राहुल टेवाटिया, रस्टी थेरॉन, सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डी’व्हिलियर्स, वरुण आरोन, सीन अबॉट, अबू नेचिम, सुब्रमण्यम बद्रीनाथ, शिशिर बावणे, मनविंदर बिस्ला, युझवेंद्र चहल, अशोक दिंडा, इक्बाल अब्दुल्ला, दिनेश कार्तिक, सर्फराझ खान, निक मॅडिसन, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिलने, हर्षल पटेल, रिले रोसू, डॅरेन सॅमी, संदीप वॉरियर, जलाज सक्सेना, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, डेव्हिड वाइज, विजय झोल.