IPL 2023 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Match Updates: आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ चेन्नईला पोहोचला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा या मोसमात प्रथमच सामना चेन्नईशी होणार आहे. या सामन्यापूर्वी मंगळवारी संजू सॅमसन आणि सीएसके कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर एकत्र सराव करताना दिसले.
राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये धोनी देखील संजू सॅमसनच्या मागे सराव करताना दिसत आहे. हे दोन्ही खेळाडू एकाच फ्रेममध्ये एकसोबत शॉट मारताना दिसत आहेत.
व्हिडिओ पोस्ट करताना, राजस्थान रॉयल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”तुम्ही हा व्हिडिओ लूपमध्ये पाहण्यापासून स्वत:ला थांबवाल का? नक्कीच नाही.” संजू सॅमसन आणि महेंद्रसिंग धोनी यांचे नाते गुरु-शिष्यासारखे असल्याचे सांगितले जाते. संजू एमएस धोनीला आपला आदर्श मानतो आणि चेन्नईला पोहोचताच त्याने सर्वप्रथम धोनीची भेट घेतली. त्यानंतर धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
दोन्ही संघांनी २-२ सामने जिंकले आहेत –
बुधवारी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे. या हंगामात दोन्ही संघ आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. सीएसके आणि राजस्थानने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स दुसऱ्या तर चेन्नई सुपर किंग्ज पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमातील त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध गमावला, परंतु त्यानंतर सीएसकेने लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबईविरुद्ध विजय नोंदवला.
दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडबद्दल बोलायचे तर, राजस्थान रॉयल्सने गेल्या पाच सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ४ वेळा पराभव केला आहे. उद्याच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना करणे सीएसकेसाठी आव्हानापेक्षा कमी नसेल. कारण राजस्थान संघात जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.